Mumbai Lake Water Storage Pudhari
मुंबई

Mumbai Lake Water Storage: मुंबईकरांची पुन्हा चिंता वाढली! तलावांतील पाणीसाठा १११ दशलक्ष लिटरने घटला

पाणी घटण्याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढणार असल्यामुळे मुंबईकरांची पुन्हा चिंता वाढली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात घट होऊ लागली. गेल्या २४ तासांत १११ दशलक्ष लिटर्सने घट झाली आहे. अजून पाणी घटण्याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढणार असल्यामुळे मुंबईकरांची पुन्हा चिंता वाढली आहे.

तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे मुंबईत सुरू असलेली पाणीकपात रद्द होऊन, टंचाईपासून मुंबईकरांची सुटका होईल, असे वाटत होते.

पण त्यानंतर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे तलावांत साठलेल्या पाण्यामध्ये आता घट होऊ लागली आहे. सध्या ही घट कमी दिसत असली तरी पाऊस लांबल्यास यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

१३ जुलैला तलावांमध्ये ७ लाख २२ हजार ६४९ दशलक्ष लिटर इतका साठा होता. १४ जुलैला सकाळी ६ वाजता तलावांतील आढावा घेतला असता, हा पाणीसाठा ७ लाख २२ हजार ५३८ दशलक्ष लिटर इतका होता. म्हणजेच सुमारे १११ दशलक्ष लिटरची घट झाली आहे.

तानसा, मोडक सागर, विहार या तलावांमध्येही घट दिसून येत आहे. विहार तलाव गेल्या आठवड्यात ओसंडून वाहू लागला होता. मात्र आता या तलावातील पाणीसाठ्यात ६० हजार दशलक्ष लिटर्सची घट झाली आहे.

त्यामुळे ही घट थांबवायची असेल तर, तलाव क्षेत्रात पाऊस पडणे आवश्यक आहे. अन्यथा मुंबईत सुरू असलेली २० टक्के पाणीकपात सध्या तरी रद्द करणे शक्य होणार नसल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT