मुंबई: मध्य व पश्चिम रेल्वेच्या नियमित गाड्यांसह गणपती विशेष गाड्याही हाऊसफुल्ल झाल्यामुळे गणपतीला गावी जायचे कसे, असा प्रश्न पडला होता. मात्र या कोकणवासीयांना राजकारणी पावले आहेत.
दादर येथून मोदी एक्स्प्रेस नाही तर शिवसेना एक्स्प्रेस या मोफत गाड्यांसह शहरातील विविध भागांतून शुक्रवार ते रविवार सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात दीड हजारपेक्षा जास्त मोफत एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणवासीयांचा गावी जाण्याचा प्रश्न सुटला आहे.
मुंबई शहर व उपनगरातून लाखो कोकणवासीय गणपतीला गावी जातात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण चार महिने अगोदरच फुल्ल होते. एवढेच नव्हे तर विशेष रेल्वेचे आरक्षणही अवघ्या दोन मिनिटांत फुल्ल होते.
त्यामुळे गणपतीला जायचे कसे, असा प्रश्न दरवर्षी लाखो कोकणवासीयांना पडतो. परंतु या कोकणवासीयांना दरवर्षी राजकारणी पावतात. यावेळी तर भाजप, शिवसेना यांनी मोठ्या प्रमाणात गणपती विशेष एसटी बस कोकणासाठी सोडल्या आहेत.
नितेश व नीलेश राणे या बंधूंनी यंदा दादर येथून मोदी व शिवसेना एक्स्प्रेस नावाने तीन ट्रेन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, कुडाळसाठी सोडल्या आहेत. तर मुंबई भाजप व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोडलेल्या मोफत ट्रेनसह विविध राजकीय पक्षांनी संपूर्ण शहरातून दीड हजारपेक्षा जास्त मोफत एसटी बस चालवण्यात येणार आहेत.
यात अनेक बस तालुकानिहाय, तर काही बस थेट गावापर्यंत सोडण्यात आल्या आहेत. या बस शुक्रवारी रात्रीपासून कोकणात रवाना झाल्या असून शनिवार व रविवारीही या बस धावणार आहेत. यासाठी एसटीच्या विविध जिल्ह्यांतील आगारांतून या बस वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मैदानात दाखल झाल्या आहेत.
परतीचा प्रवास तुम्हीच करा !
गणेशोत्सवासाठी मुंबई शहरातून कोकणात विशेष बस धावणार असल्या तरी परतीचा प्रवास कोकणवासीयांना स्वखर्चानेच करावा लागणार आहे. त्यामुळे गौरी-गणपती गेल्यानंतर लाखो कोकणवासीय परतीच्या प्रवासाला निघतील, तेव्हा राजकीय पक्षांच्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या ट्रेनने गर्दी करून मुंबई गाठावी लागणार आहे, तर दामदुप्पट भाडे देऊन, खासगी बसनेे प्रवास करावा लागणार आहे.
येथून सुटणार गाड्या
भांडुप, कांजूर मार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम, परळ, लालबाग, काळाचौकी, गिरगाव, नायगाव, दादर, वांद्रे पूर्व, खार पूर्व, जोगेश्वरी, दहिसर, बोरिवली.
कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या हाऊसफुल्ल झाल्या. त्यामुळे गावी जाण्यासाठी कोकणवासीयांची वणवण बघून भारतीय जनता पक्षाच्या निर्देशानुसार कोकण विकास आघाडीने कोकणात विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला. कोकणात आपल्या मूळ गावी जाऊन त्यांनी आनंदात उत्सव साजरा करावा एवढीच अपेक्षा.श्रावणी मिलिंद पारकर, उपाध्यक्ष, कोकण विकास आघाडी