Fast Train Mumbai Kolhapur
मुंबई : मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई या दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण होणार आहे. सध्या पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्स्प्रेस धावते.
क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या गाडीची तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या पंधरा दिवसात ही वंदे भारत मुंबईहून कोल्हापूरसाठी धावणार आहे. यापूर्वी कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत धावत होती. तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
नवीन वंदे भारत रेल्वेला आठ डबे असणार असून 550 प्रवाशांना वाहून नेण्याची तिची क्षमता आहे. लवकरच या रेल्वेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे, अशी माहिती एका अधिकार्याने दिली.
या रेल्वेमुळे कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-कोल्हापूरदरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल, तर मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी फक्त 7 तास लागणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा वेळ 3 ते 4 तासांनी कमी होणार आहे.
राज्यात सध्या 11 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यात मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपूर, इंदूर ते नागपूर, नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी या मार्गांचा समावेश आहे.