खाऊगल्ल्यांना गॅसचा चटका; दहा लाख मुंबईकरांना जेवणाची भ्रांत ! pudhari photo
मुंबई

Mumbai street food gas crisis : खाऊगल्ल्यांना गॅसचा चटका; दहा लाख मुंबईकरांना जेवणाची भ्रांत !

काही विक्रेत्यांकडे दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

तीन दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर बुक केला आहे, मात्र आजपर्यंत तो मिळाला नाही. त्यामुळे उद्या स्टॉल बंद करावा लागेल, अशी वेळ मुंबईतील बहुतांश खाऊगल्ली व पदपथांवरील अन्नपदार्थ विक्रेत्यांवर आली आहे. काही विक्रेत्यांकडे दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत न झाल्यास सामान्य मुंबईकरांचे कमी पैशांत पोट भरणाऱ्या खाऊगल्ल्या गॅसअभावी बंद पडणार आहेत.

मुंबई शहर व उपनगरांत किमान सात ते आठ हजार खाऊगल्ल्या आहेत. त्यावर दररोज दहा लाख मुंबईकर आपले पोट भरत असतात. या खाऊगल्ल्या बंद पडणार असल्याने सामान्य मुंबईकरांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ येणार आहे.

सीएसएमटी व क्रॉस मैदान ओलांडल्यानंतर आयकर भवनजवळ असलेली खाऊगल्ली सर्वात मोठी व प्रसिद्ध आहे. दक्षिण मुंबईमध्ये कामानिमित्त येणारे नागरिक दुपारची भूक भागवण्यासाठी येथे येत असतात. येथे मिळणारे पदार्थ हे परवडणारे व पोट भरणारे असतात. एकट्या या ठिकाणी चार ते पाच हजार चाकरमानी मुंबईकर दररोज आपली भूक भागवत असतात.

आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही हे आवडीचे ठिकाण बनले आहे. श्रीमंतवर्गही वाढला आहे. तसेच मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्यांचेही हे हक्काचे ठिकाण बनले आहे. मात्र पुढील दोन तीन दिवसांत ही खाऊगल्ली गॅसअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. इतर पदार्थ सोडा, साधा वडापावही आम्ही बनवू शकत नाही, अशी व्यथा येथील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. या खाऊगल्लीसह मुंबई शहर व उपनगरांतील सात ते आठ हजार खाऊगल्ल्या आहेत. पदपथावरील स्टॉल वेगळेच, त्यामुळे किमान दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांची उपासमार होणार आहे.

५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल थांबणार

मुंबईत रस्त्यांवरील अत्रपदार्थ खाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता दररोज ५० ते ६० कोर्टींपेक्षा जास्त उलाढाल होते. वर्दळीच्या ठिकाणी एका वडापाव स्टॉलचा दिवसभराचा गल्ला सरासरी दहा हजारांच्या घरात जातो. साउथ इंडियन पदार्थ विकणाऱ्यांची कमाई १० ते १५ हजारांच्या घरात आहे. त्याशिवाय पावभाजी व अन्य खाद्यपदार्थ स्टॉलवरही दिवसभराचा २० ते २५ हजारांचा गल्ला असल्याचे सांगण्यात येते. मात्र मुंबईकरांबरोबर या विक्रत्यांवर मोठे संकट आले आहे. व्यवसायच बंद पडला तर त्यांच्या घरातील किचनही बंद पडणार आहे.

दोन ते तीन दिवस एक सिलिंडर कसाबसा पुरतो. आमच्याकडे दोन ते तीन सिलिंडरचा साठा असतो. यावर आठवडाभर व्यवसाय करता आला. पूर्वी १२ ते २४ तासांत सिलिंडर मिळत होता. आता दोन-तीन दिवसांपासून बुक केलेले सिलिंडर आजपर्यंत मिळालेले नाहीत. लावलेला सिलिंडर संपला की स्टॉल बंद होणार आहे. हीच परिस्थिती प्रत्येकाची आहे.
गोपाळ शर्मा, सीएसएमटी खाऊगल्ली स्टॉलधारक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT