मुंबई : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन चारजणांच्या एका टोळीने चौदा वर्षांच्या मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे.
याप्रकरणी चारही आरोपींना समतानगर पोलिसांनी अटक केली. त्यात दोन अल्वयीन मुलांचा समावेश असून त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर इतर दोघांनाही दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी चौदा वर्षांची असून ती कांदिवली परिसरात राहते. चारपैकी एक अल्पवयीन आरोपी तिच्या परिचित असून तो त्याच परिसरात राहतो. गेल्या आठवड्यात त्याने तिला त्याच्याकडे तिचे आंघोळ करतानाचे काही अश्लील व्हिडीओ आहेत. ते व्हिडीओ डिलीट करायचे असेल तर तिला सोबत यावे लागेल असे सांगितले. ती त्याच्यासोबत गेली. काही वेळानंतर तो तिला एका रुममध्ये घेऊन आला. तिथेच तिच्या परिचित इतर तीन मुले होती.
या चौघांनी तिचे अश्लील व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तसेच ते व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड न करण्यासाठी तिच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. तिला बदनामीची धमकी देऊन त्यांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला होता. बदनामीच्या भीतीने तिनेही हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
या घटनेनंतर मंगळवारी १० नोव्हेंबरला यातील एका आरोपीने तिला स्नॅपचॅटवर मॅसेज करुन तिला पुन्हा त्याच्या घरी बोलावून घेतले. ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी आरोपीसह त्याच्या मित्राने तिच्यावर दुसर्यांदा सामूहिक बलात्कार केला होता. शेवटी तिने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली.
अटक आरोपींपैकी दोन आरोपी सतरा, तिसरा आरोपी अठरा तर चौथा बावीस वर्षांचा आहे. चौघांनीही मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.