मुंबई: मनी लाँडरिंगच्या बनावट प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ५५ वर्षीय आयटी इंजिनियरला ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल १ कोटी ६७ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात बी.टेक. पदवीधरासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी पोलीस तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून पीडिताला भीती दाखवली. त्यानंतर बनावट सर्वोच्च न्यायालयाचे पत्र व पोलिसांचे बोधचिन्ह असलेले पत्र पाठवून त्याला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले होते,अशी माहिती सोमवारी सायबर सेलचे पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, २ एप्रिल रोजी तक्रारदाराला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्यांनी आपण पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगितले. तक्रारदाराच्या बँक खात्याचा वापर मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात झाल्याचे सांगत त्याला कारवाईची धमकी देण्यात आली.
आरोपींनी तक्रारदाराचा विश्वास बसावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे बनावट पत्र आणि पोलिसांचे बोधचिन्ह असलेले पत्र पाठवले. त्यानंतर त्याला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे सांगून सतत फोनवर ठेवण्यात आले. पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे भासवत त्याला कोणाशीही संपर्क साधू न देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तक्रारदाराच्या बँक खात्यातील सर्व पैसे एका खात्यात जमा करण्यास आरोपींनी सांगितले. रक्कम तपासल्यानंतर ती परत केली जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला. त्यासाठी आरोपींनी तक्रारदाराला वेगवेगळे बँक खाते क्रमांक दिले.
आरोपींच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या तक्रारदाराने त्यांच्या सांगण्याप्रमाणे एकूण १ कोटी ६७ लाख रुपये विविध खात्यांमध्ये वर्ग केले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा उपायुक्त बजरंग बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पूनम जाधव, अंजली वाणी, डॉ. नितीन गच्चे, अमोल माळी, शंकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला. पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई, झारखंड व नवी दिल्ली येथे एकाचवेळी छापे टाकून सात आरोपींना अटक केली.
परदेशातून कॉल; सिम बॉक्सचा वापर
या टोळीने फसवणुकीसाठी वापरलेले फोन कॉल भारताबाहेरून करण्यात आले आणि सिम बॉक्सच्या माध्यमातून भारतात रूट करण्यात आले, असे तपासात समोर आले आहे. सैफीने हा सिम बॉक्स उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच अलीने आरोपींना ४३ सिमकार्ड उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी एका सिमकार्डचा वापर या गुन्ह्यात करण्यात आला.
६१३ सिमकार्डसह मोठा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल साहित्य जप्त केले आहे. त्यात २७ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, पाच डिजिटल स्वाक्षरी उपकरणे, विविध कंपन्यांची ६१३ सिमकार्ड, १० चेकबुक, दोन पासबुक आणि दोन एटीएम कार्ड यांचा समावेश आहे. फसवणुकीची रक्कम ज्या खात्यांमध्ये वळवण्यात आली होती, त्यापैकी काही खात्यांतील सुमारे ३४ लाख रुपये पोलिसांनी गोठवले आहेत.
सात आरोपींची भूमिका उघड
अटक केलेल्यांमध्ये संजय शाह (वय ५८), ३२ वर्षीय महिला, ऋषी मीना (वय ३८), नौशाद अली (वय ३१), खालिद सैफी (वय २७), जगेश्वर महतो (वय ४३) व जाबीर हुसेन (वय ४६) यांचा समावेश आहे. ३२ वर्षीय महिलेची ओळख पोलिसांनी जाहीर केलेली नाही. सर्व आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात प्रत्येक आरोपीची भूमिका वेगवेगळी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी संजय शाह हा इतर आरोपींना सिमकार्ड व ओटीपी उपलब्ध करून देत होता. तर, ऋषी मीना हा बी.टेक. (आयटी) पदवीधर असून फसवणुकीची रक्कम बँक खात्यातून पुढे वळवण्यासाठी तांत्रिक मदत करत होता.नौशाद अली याने इतर आरोपींना सिमकार्ड विकल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच, खालिद सैफी याने तांत्रिक साधनांचा वापर करून ‘डिजिटल अरेस्ट’साठी तक्रारदाराला फोन रूट केला. जगेश्वर महतो व जाबीर हुसेन यांच्या खात्यांत मिळून सुमारे १.१७ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यानंतर ही रक्कम इतर आरोपींकडे वळवण्यात आली. ३२ वर्षीय महिला आरोपी, जी फॅशन डिझायनिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेली आहे, तिच्या खात्यात ५०.६ लाख रुपये जमा झाले. त्यानंतर तिने ही रक्कम इतर आरोपींच्या खात्यांमध्ये पाठवली.