Mumbai Rain
मुंबई: गेल्या चार दिवसांपासून देशाच्या आर्थिक राजधानीला पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई व उपनगरांमध्ये पावसाचा तडाखा सुरूच असून भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (दि.१९) सकाळी मुंबई आणि रायगडसाठी नवीन रेड अलर्ट जारी केला आहे. ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मुसळधार पावसामागे हवामानातील अनेक घटक जबाबदार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या प्रणालीला इतर हवामान बदलांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai Rain)
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचवेळी अरबी समुद्रावर निर्माण झालेला पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा, यामुळे मुंबई परिसरात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या दोन्ही प्रणालींकडून येणाऱ्या बाष्पामुळे या संपूर्ण प्रदेशात, विशेषतः मुंबईत जास्त दिवस जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर २४ तासांत २०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, ज्याला हवामान शास्त्राच्या भाषेत 'अतिवृष्टी' म्हटले जाते.
सर्वसाधारणपणे मान्सूनचा पाऊस अधूनमधून सरींच्या रूपाने पडतो. मात्र, सध्याचा पाऊस सलग आणि अविरतपणे सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा एकाच ठिकाणी स्थिर झाला आहे. या स्थिर प्रणालीमुळे बाष्पयुक्त वारे सतत एकाच प्रदेशावर ढग तयार करत आहेत, ज्यामुळे पावसाची संततधार कायम आहे. मुंबईसाठी ऑगस्ट हा दुसरा सर्वाधिक पावसाचा महिना असतो, ज्यामध्ये सरासरी ५६० ते ६२० मिमी पाऊस पडतो. मात्र, १५ ऑगस्टच्या संध्याकाळपासून सुरू झालेला हा पाऊस अपवादात्मक ठरला आहे. ८४ तासांत ५०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, जे जवळपास संपूर्ण महिन्याच्या सरासरीइतके आहे.
मुंबईकरांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या अतिवृष्टीचा अनुभव घेतला आहे. २००५ साली आलेल्या महापुरात एकाच दिवसात ९४४ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली होती. मात्र, सध्याच्या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे एका दिवसात प्रचंड पाऊस न कोसळता, अनेक दिवस संततधार सुरू राहणे हे आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे वातावरणातील आर्द्रतेची क्षमता वाढते आणि अशा पर्जन्यवृष्टीच्या घटना घडतात. मात्र, या एका घटनेला थेट हवामान बदलाशी जोडण्यासाठी दीर्घकालीन माहितीच्या विश्लेषणाची आवश्यकता असेल, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Mumbai Rain)