Mumbai Illegal Arms Seizure Pudhari
मुंबई

Mumbai Illegal Arms Seizure: मुंबईत बेकायदा शस्त्रांचा साठा जप्त; दोन पिस्तुले आणि १९ जिवंत काडतुसे हस्तगत

२६ गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला वसीम परदेशी अटकेत; आर्थिक व्यवहार, फरार साथीदारांचा शोध

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत बेकायदा शस्त्रांची आवक आणि त्यामागील पुरवठा साखळी शोधण्यासाठी गुन्हे शाखेने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. आग्रीपाडा परिसरात दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि १९ जिवंत काडतुसे जप्त केल्याप्रकरणी ३८ वर्षीय वसीम अक्रम अन्वर परदेशी याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीवर यापूर्वी २६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात शस्त्रे नेमकी कोठून आली, त्यासाठी पैसे कोणी दिले आणि ती कोणाकडे पोहोचवली जाणार होती, याचा तपास सुरू आहे.

१४ नोव्हेंबरला आग्रीपाडा येथील डोसा कंपाउंड परिसरात क्राइम ब्रँचने सापळा रचून गणेश लांडगे याला पकडले होते. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि १९ काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर चौकशीत त्याच्या साथीदारांची माहिती पुढे आली. त्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची दिशा बदलत वसीम परदेशी याचा शोध सुरू केला.

गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वसीम परदेशी उल्हासनगर येथील नातेवाइकाच्या घरी असल्याचे समोर आले. तेथे छापा टाकून त्याला २२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागण्यात आली.

शस्त्रांचा व्यवहार, पैशांचा माग

जप्त केलेली पिस्तुले कोणत्या मार्गाने मुंबईत आली, त्यांचा पुरवठादार कोण आहे, शस्त्रे खरेदीसाठी आर्थिक व्यवहार कसे झाले आणि आरोपींचे अन्य गुन्हेगारांशी संबंध आहेत का, याचा तपास केला जात आहे. आरोपींच्या बँक खात्यांतील व्यवहार तपासून शस्त्र खरेदी-विक्रीशी संबंधित आर्थिक साखळी शोधण्याचा प्रयत्न होणार आहे. फरार अमर तुसामकर आणि अन्य साथीदारांचा शोधही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT