Mumbai Illegal Bike Taxi Pudhari
मुंबई

Mumbai Illegal Bike Taxi: मुंबईत बेकायदा बाईक टॅक्सी सुरूच; बंदीच्या आदेशांनंतरही प्रशासन निष्क्रिय?

गिग कामगार मंचाचा आरोप; परवान्यांवर कारवाई नाही, प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात बेकायदा बाईक टॅक्सी सेवांवर बंदी घालण्याचे परिवहन मंत्री यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही; मुंबई येथे ही सेवा सुरू आहे, असा आरोप भारतीय गिग कामगार मंच कडून केला जात आहे. या आदेशाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी परिवहन प्रशासनाने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी मंचची आहे.

याबाबत मंच अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, मुंबई शहर व उपनगरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरूच असल्याचे समोर येत आहे. संबंधित कंपन्यांना दिलेले परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात; कारवाई प्रभावीपणे होत नसल्याची टीका होत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील अनेक दुचाकीचालक अजूनही विविध ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करत असून ते खुलेपणाने बुकिंग स्वीकारताना दिसत आहेत.परिवहन विभागाने ही सेवा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले असले तरी अंमलबजावणीत त्रुटी असल्याचे चित्र आहे.त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर तातडीने कठोर कारवाई करावी.

यासंदर्भात परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ठोस माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आले. तसेच संबंधित विभागाकडून स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.संबंधित कंपन्यांना सरकारची किंवा देशातील कायद्यांची कोणतीही भीती राहिलेली नाही.कंपन्या उघडपणे सर्व नियमांना पायदळी तुडवत बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी सेवा चालवत आहेत.आम्ही कोणालाही घाबरत नाही, परिवहन मंत्र्यांचे आदेश किंवा देशातील कायदा-सुव्यवस्थेला न जुमानता व्यवसाय सुरूच ठेवणार,असा संदेश या कंपन्यांकडून दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

यावर परिवहन प्रशासनाने तातडीने कारवाई करून कायद्याचे पालन करावे.तसेच या सेवेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची चिंता वाढत आहे. याचबरोबर अपघातवेळी विमा संरक्षण,चालक पात्रता व नियमांचे पालन या बाबींबाबत अद्याप स्पष्टता नाही. याचा सर्व विचार करून बेकायदा बाईक टॅक्सी सेवांवर काटेकोर कारवाई होण्यासाठी परिवहन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मंचने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT