

नागपूर: बहुचर्चित अशोक खरात प्रकरणी केवळ कोणासोबत फोटो आहे म्हणून मंत्र्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. या प्रकरणात राजकारण करण्यापेक्षा पीडित महिलांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२२) येथे केले. "तपासात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मात्र पुराव्याशिवाय मंत्र्यांची बदनामी सहन केली जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावले.
मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांशी झालेल्या गैरव्यवहाराबाबत वरिष्ठ पातळीवर सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचे दररोज 'मॉनिटरिंग' केले जात असून, मी स्वतः पोलीस महासंचालकांशी बोललो आहे. नाशिक पोलीस आणि एसआयटी (SIT) या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत. ज्यांच्याकडे काही पुरावे असतील, त्यांनी ते थेट पोलिसांकडे द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस यांनी टोला लगावला की, "विशेष मंत्रिमंडळ बैठकीत ४० किलोमीटरवरून पाणीपुरवठा करताना कोणाला झुकते माप दिले गेले, हे आता माध्यमांमुळे सर्वांसमोर आले आहे. ज्यांनी हा पाणीपुरवठा मिळवून दिला, त्यांना आता कोणती शिक्षा द्यायची?"
पीडित महिलांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री
सार्वजनिक जीवनात कोणीही कोणासोबत फोटो काढू शकते, त्यावरून कोणाचे गुन्हेगारी संबंध जोडणे चुकीचे आहे. विरोधी पक्षातील कोण-कोणते नेते संबंधित ठिकाणी गेले होते, याचे भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे केवळ 'सिलेक्टिव्ह' राजकारण करू नका. विशिष्ट मंत्र्यांचे नाव घेणारे लोक स्वतःच्या पुराव्यांबाबत आता गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हाला राजकारणात रस नाही, तर महिलांच्या सन्मानाची चिंता आहे. त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
"विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे धागेदोरे माझ्याकडे आहेत. पुराव्यांची फेकाफेक करण्यापेक्षा ते पोलिसांना द्या. महिलांना न्याय मिळवून देणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे."
— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री