मुंबई : मुंबई विभागातील बारावी परीक्षेच्या निकालात यंदा धक्कादायक चित्र समोर आले असून तब्बल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना शून्य टक्के निकालाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये तीन महाविद्यालयांचा एकूण निकालच शून्य टक्के लागला असून सात महाविद्यालयांमध्ये विशिष्ट शाखांचा निकाल शून्य टक्के लागल्याची बाब उघड झाली आहे.
महाविद्यालयांचा निकाल हा प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाचा निकष मानला जातो. चांगल्या निकालामुळे विद्यार्थ्यांचा कल त्या महाविद्यालयाकडे वाढतो, तर शून्य निकालामुळे संस्थेच्या प्रतिमेलाही धक्का बसतो. यंदा मुंबई विभागातील काही महाविद्यालयांना याच परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.
ठाणे जिल्ह्यात एका महाविद्यालयाचा एकूण निकाल शून्य टक्के लागला, तर चार महाविद्यालयांमधील काही शाखांना ‘खातेही उघडता’ आले नाही. अंबाडी येथील गुरुकुल विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून एकमेव विद्यार्थी परीक्षेला बसला होता; तो अनुत्तीर्ण ठरल्याने निकाल शून्य लागला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील तिन्ही विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले, तर विज्ञान शाखेत 10 पैकी 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कल्याणमधील आर. के. रात्र कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील दोन्ही विद्यार्थी नापास, तर कला शाखेतील दोन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने एका शाखेचा 100 टक्के,तर दुसऱ्याचा शून्य टक्के निकाल लागला. जे. के. पाटील इंग्लिश मिडियम स्कूल व महाविद्यालयात विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के असताना कला शाखेतून एकमेव विद्यार्थी नापास झाल्याने त्या शाखेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
पालघर जिल्ह्यातही एका महाविद्यालयाचा पूर्ण निकाल शून्य लागला असून चार महाविद्यालयांतील काही शाखांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. जव्हार तालुक्यातील भगवान बिरसा मुंडा आयटीआयमध्ये टेक्निकल सायन्स शाखेतील एकमेव विद्यार्थी नापास झाल्याने निकाल शून्य राहिला. शारदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतही एकच विद्यार्थी परीक्षेला बसला होता आणि तो अनुत्तीर्ण ठरल्याने निकाल शून्य लागला, तर इतर शाखांचा निकाल समाधानकारक राहिला आहे.
विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालये या यादीत असून रायगड जिल्ह्यात मात्र एकाही महाविद्यालयावर ही नामुष्की ओढवलेली नाही.
मुंबई शहरातही एक महाविद्यालय पूर्णपणे शून्य निकालासह समोर आले. प्रियदर्शनी विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये कला शाखेतून एकच विद्यार्थी परीक्षेला बसला होता; तो अपयशी ठरल्याने संपूर्ण महाविद्यालयाचा निकाल शून्य लागला आहे.