मुंबई ः गिरगाव येथील नाना चौकातील रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते.  (छाया : दीपक साळवी)
मुंबई

Mumbai rain : पावसाने मुंबईला पुन्हा तुंबवले

रेल्वे सेवा विस्कळीत, रस्त्यांवर वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई :मुंबई शहर व उपनगरात रविवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा तुंबवले. सकाळी वरळीसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे संपूर्ण जनजीवनच ठप्प पडले. पश्चिम व मध्य रेल्वेची उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. अनेक रस्तेही वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास खडतर झाला.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या आठवड्यात तर कडक ऊन पडले होते. पण रविवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर पकडला. सोमवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला तुंबून टाकले. उपनगरापेक्षा शहरात सर्वाधिक 119 मिमी पाऊस झाला. त्या तुलनेत उपनगरात कमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरात 77 मिमी तर पूर्व उपनगरा 75 मिमी पावसाची नोंद झाली.

पहाटे पावसाचा जोर असल्यामुळे वरळी नाका येथे कधी न तुंबणारे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबल्यामुळे या भागातील संपूर्ण वाहतूक ठप्प पडली. शहरातील अन्य भागातही पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पावसाचा जोर यामुळे पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील लोकल तब्बल 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे सकाळी वसई विरार आधी भागातून कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास अर्ध्या तासाने लांबला.

ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे व पावसाचा जोर यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे मंदावली. पश्चिम द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, काळबादेवी रोड, डी. एन. रोड, दक्षिण मुंबई नरिमन पॉईंट व वरळी लोअर परेल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे सकाळी उपनगरातून दक्षिण मुंबईत जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली. सकाळी दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर उतरल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे संध्याकाळी वाहतूक सुरळीत झाली होती.

22 ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या

शहर, उपनगरांत 22 ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. यातील काही झाडे रस्त्यावर पडल्यामुळे काही काळासाठी रस्ते बंद होते. मात्र झाडे तातडीने हटवल्यामुळे वाहतुकीचा फारसा कोळंबा झाला नाही. दहा ठिकाणी किरकोळ शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर दोन ठिकाणी घराच्या भिंतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

पावसाची सेंचुरी

मुंबई पावसाची सेंचुरी पूर्ण झाली असून सोमवार सकाळपर्यंत 101 टक्के पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस झाला. सर्व उपनगराची तुलना केल्यास उपनगरात सर्वाधिक 120 टक्के पाऊस झाला असून शहरात 88 टक्के पाऊस नोंदवला गेला. उपनगरात वार्षिक सरासरी पाऊस 2319 मिमी होतो. यंदा उपनगरात 2786 मिमी पाऊस झाला आहे.

पालिका कर्मचारी रस्त्यावर

शहरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा करण्यासाठी कार्यरत होते. कोणती आपत्कालीन घटना घडल्या तर तात्काळ मदत मिळावी, यासाठी अग्निशमन दलही सतर्क झाले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी सकाळी 100 पेक्षा जास्त पंप सुरू करण्यात आले होते. त्याशिवाय हाजी अली व अन्य ठिकाणचे मोठे पंपही सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

24 तासातील सर्वाधिक पाऊस

बांद्रा 176 मिमी

वरळी 170 मिमी

दादर 160 मिमी

घाटकोपर 106 मिमी

कुलाबा 1 59 मिमी

खार 141 मिमी

तुर्भे 114 मिमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT