मुंबई: गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. संततधारेमुळे मंगळवारी वाहतूक मंदावली आणि सायंकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांच्या गाड्या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या.
जुलै महिन्यात झोडपून काढणाऱ्या पावसाने मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे दडी मारली होती. परंतु मंगळवारी पहाटेपासून पुन्हा पाऊस दाखल झाला आहे. पावसाचा फारसा जोर नसला तरी पूर्ण शहरात पाऊस सक्रिय झाला.
काही भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे सकल भागात पाणी तुंबले होते. मात्र वाहतुकीवर याचा फारसा परिणाम झाला नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे वाहनांचा वेग मात्र मंदावला. परिणामी संपूर्ण शहरात तील प्रमुख रस्ते वाहतूक कोंडीत सापडले होते.
दक्षिण मुंबईतील डी. एन. रोडसह पी. डिमेलो रोड, काळबादेवी रोड, पायधुनी, भायखळा, वरळी प्रभादेवी, दादर, धारावी, सायन पूर्व उपनगरात एलबीएस मार्ग कुर्ला, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द घाटकोपर, भांडुप, तर पश्चिम उपनगरात एस. व्ही. रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, व अन्य लहान मोठ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.
पाऊस व वारा यामुळे १८ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. ६ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या किरकोळ घटना घडल्या. तीन ते चार ठिकाणी घरांच्या भिंतीची पडझड झाली.
मुंबई-ठाणे-पालघरला यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघरसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत बुधवारीही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. गुरुवार ते शनिवार या काळात पावसाचा जोर मात्र ओसरेल.