मुंबई : प्रकाश साबळे
कबुतरे पोसणारेच उठलेत मुंबईकरांच्या जीवावर, असे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आता आली आहे. कबुतरांपासून होणारे आजार माहीत असतानाही दादरच्या कबुतरखान्यावर झालेल्या कारवाईनंतरही कबुतरांसाठीची धान्याची पोती दादरच्या कबूतरखान्यात येऊन पडली. त्यामुळे याला आता जबाबदार कोणाला ठरवायचे? कबुतरांना की त्यांना पोसणार्यांना ?
मुंबईतील कबुतरखानेच मुंबईकरांच्या जिवावर उठलेत, असा विषय घेऊन कबुतरांपासून होणार्या आजारांवर राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेत चर्चा झाली. त्यावर सरकारने शहरातील सर्व कबुतरखाने हटवण्याचे आश्वासनही दिले. त्यानंतर दुसर्याच दिवशी दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई झाली, पण त्यानंतर ये रे माझ्या मागल्या...
कबुतरखान्यात ठेवण्यात आलेल्या धान्याच्या पोती आणि शेडवर पालिकेने केलेल्या कारवाईनंतरही कबुरखान्यात पुन्हा धान्यांची पोती लागली. त्यामुळे आधी या धान्य पुरवणार्या आणि टाकणार्या माणसांचा बंदोबस्त करा, कबुतरे आपोआप जातील, असा इशारा दादरकरांकडून दिला जात आहे.
दादर पश्चिमेकडील ब्रिटिशकालीन असलेल्या कबुतरखान्यावरील शुक्रवारी पालिकेने लोखंड पत्रे, शेड आणि धान्याच्या गोण्या जप्त करून कारवाई केली. मात्र पुन्हा या कबुतरखान्यावर धान्याच्या गोण्या आणि कबुतरांना धान्य टाकण्यात आल्याचे प्रकार सुरू झाले आहेत, यामुळे पालिकेने केलेली कारवाई दिखाव्यापुरती होती, हे तर स्पष्ट झाले. कारण मुंबईकरांच्या जीवाशी खेळणार्यांना आता धान्यच मिळणार नाही, अशी कायमस्वरुपी व्यवस्था मात्र पालिकेने केली नाही. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दादर कबुतरखान्यावर धान्य टाकणार्या नागरिकांना थांबविण्यासाठी किंवा कारवाईसाठी महापालिकेकडून कुठलाही गार्ड नेमण्यात येणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे कबुतरखान्यावर धान्य टाकणार्यांना चाप नेमका कसा बसणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कबुतरखान्यात पुन्हा धान्याची पोती ठेवली असतील तर कारवाई केली जाईल. कबुतरांना धान्य टाकू नये, यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. कबुतरांच्या विष्टेमुळे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, यांची माहिती वारंवार जाहीर करण्यात आली आहे.विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त, जी. उत्तर विभाग
दादर येथील कबुतरखान्यावर पालिकेने कारवाई केली, तेव्हा जैन समाजाकडून विरोध झाला. त्यामुळे ज्याप्रमाणे कोविड काळात विनामास्क फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती, त्याप्रमाणे आता कबुतरांना धान्य टाकणार्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा आम्ही मानसैनिक रस्त्यावर उतरून कबुतरखाना बंद करू, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पर्यावरण अध्यक्ष जय शृंगारपुरे म्हणाले.