मुंबई : धर्मकार्य म्हणून दाणे टाकून पोसले जाणारे कबुतरखाने मुंबईकरांच्या जिवावर उठले असून, या कबुतरांची विष्ठा, त्यांच्या फडफडण्यातून हवेत पसरणारे पंखांचे सूक्ष्म कण श्वासातून फुप्फुसात जाऊन वाढत चाललेले दुर्धर श्वसनविकार याची गंभीर दखल घेत मुंबईभर पसरलेले कबुतरखाने बंद करण्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.
कबुतरांमुळे वाढत असलेले श्वसनविकार, दुर्गंधी व प्रदूषणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कबुतरखाने बंद केले जाणार असून, मुंबईतील कबूतरखान्यांच्या बाबतीत तातडीने विशेष अभियान राबविण्यात येईल. तसे आदेश मुंबई महापालिकेला देण्यात येतील, असे उदय सामंत म्हणाले.
मुंबईतील कबुतरांची संख्या वाढत असून त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या आजाराचा धोका निर्माण होत असल्याचा प्रश्न भाजपच्या आमदार चित्रा वाघ, शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
कबुतराच्या विष्टेमुळे अंधेरी (भराडवाडी) येथे राहणारी माझ्या मामीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात दिली. त्या म्हणाल्या, कबुतराच्या विष्टेमुळे मामीला हायपर सेन्सिटिव्ह आजार जडला. याची सुरुवात दोन महिन्यात झाली आणि अवघ्या दीड वर्षात माझी मामी संपून गेली. केवळ माझी मामीच नाही तर सकाळी तिच्या सोबत ’वॉक’ ला जाणार्या इतर दोन-तीन महिलाही बाधित झाल्या आहेत. त्यांना ऑक्सिजन लावावा लागतो. श्वास घ्यायला त्रास होतो आणि माणूस हळूहळू संपून जातो, असे सांगत कबूतरांसंदर्भात संबंधित सोसायटीने पालिकेच्या ’के’ वॉर्डला तक्रार करुनही त्याची दखल घेतली नसल्याचे वाघ म्हणाल्या.
या चर्चेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत 51 कबूतरखाने आहेत. काही कबूतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते, पण हे कबूतरखाने पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. कबूतरांना धान्य टाकणे थांबवावे यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेला एका महिन्यात कबूतरखाने बंद करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे निर्देश लवकरच दिले जातील.