मुंबई : पावसाळापूर्व फेरीवालामुक्त झालेली मुंबईतील गर्दीची ठिकाणे (रेल्वे स्टेशन परिसर) पुन्हा फेरीवाल्यांनी गजबजली आहेत. त्यामुळे महापलिकेने फेरीवालामुक्त मोहीम पुन्हा हाती घेतली आहे. यासाठी विभाग कार्यालयांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अतिक्रमण निर्मूलन पथक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या चार महिन्यांत महापालिकेची अतिक्रमण कारवाई थंडावली होती. याचा फायदा घेत शहरात अतिक्रमणासह फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे. दादर पश्चिम व रेल्वे स्टेशनलगत महापालिकेकडून आजही कारवाई करण्यात येते. परंतु या कारवाईला सातत्य नसल्यामुळे दादर रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले दिसत आहेत. बांद्रा, अंधेरी, खार, सांताक्रुझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली, कुर्ला, चेंबूर गोवंडी, भांडुप, मुलुंड आदी भागांतही फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना तातडीने हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
ही कारवाई करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात अतिक्रमण निर्मूलन प्रत्येक नेमण्यात येणार असून यात अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांचा सुरक्षारक्षक व पोलिसांचा समावेश राहणार आहे. कारवाई केल्यानंतर फेरीवाल्यांचे सामानही जप्त केले जाणार आहे.
टप्प्याटप्प्याने कारवाई होणार
पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करून त्यानंतर मार्केट व अन्य ठिकाणी बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी फेरीवाल्यांवर दंडही आकारण्यात येणार आहे. एवढेच नाही तर त्यांचे साहित्य जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.