BMC  Pudhari Photo
मुंबई

Hawker mafia Mumbai : मुंबईत फेरीवाल्यांच्या माफिया टोळ्या!

बंदोबस्त करण्याची नगरसेवकांची महापालिका सभागृहात मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेले काही दिवस मुंबईतील रस्त्यांवर सुरू असलेल्या बेकायदा फेरीवाल्यांवरील कारवाईचे पडसाद गुरुवारी महापालिका सभागृहात पडले. भाजपसह शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी कारवाईचे स्वागत करीत मुंबईत फेरीवाल्यांची व्यवस्था करण्यासाठी माफिया टोळ्या कार्यरत असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी लावून धरली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी फेरीवाल्यांसाठी समर्पित झोन तयार करावेत, अशी मागणी यावेळी केली.

शिवसेना उबाठाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी सभागृहात मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा उपस्थित केला. फेरीवाल्यांची व्यवस्था करण्यासाठी मुंबईत माफिया टोळ्या कार्यरत आहेत. या माफियांचे मुंबईत कार्यालय असून त्यांना राजकीय संरक्षण असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांना हिरवी पट्टी, निळी पट्टी आणि पिवळी पट्टी अशी एक संहिता असून त्यानुसार फेरीवाल्यांकडून ते वसुली करीत असतात. प्रत्येक माफियाकडे अंदाजे 300 ते 400 गाड्या किंवा स्टॉल असतात, असे सांगितले.

यावर काँग्रेस गटनेता अशरफ आझमी यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी लोक फेरीवाले बनतात. रस्त्यावर काहीतरी विकणे हा गुन्हा नाही असे सांगत राज्य सरकारने फेरीवाल्यांसाठी समर्पित झोन तयार करावेत अशी मागणी केली. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी,फेरीवल्यांमुळे मुंबईची आर्थिक परिस्थिती खराब होत असून सर्व नगरसेवकांनी फेरीवाल्यांना विरोध करावा असे आवाहन केले.

वायू प्रदूषणाचा मुद्दा गाजला

महापालिका सभागृहात मुंबईतील वायू प्रदूषणावरही चर्चा झाली. भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विविध बांधकाम प्रकल्प आणि वाहनांच्या उत्सर्जनामुळे शहरात प्रदूषण वाढले आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. खराब हवेच्या गुणवत्तेचा परिणाम नागरिकांना थेट जाणवत आहे. श्वसनाचे विकार वाढले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. तर भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी प्रशासनाच्या कामात पारदर्शकता असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनीही गोवंडीतील एसएमएस कंपनीकडून वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत गोवंडीतील 10 लाख लोकांवर परिणाम होत असल्याचे सांगितले. यावर महापौरांना योग्य ती कारवाई केली जाईल असे नगरसेवकांना आश्वासीत केले.

काँग्रेस एकाकी

सभागृहात फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत चर्चा करताना शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी भाजपच्या सुरात सूर मिसळले. त्यामुळे विरोधी पक्षातील काँग्रेस नगरसेवक एकाकी पडल्याचे चित्र होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT