मुंबई

Mumbai Hawker Committee: नगर पथविक्रेता समिती निवडणुकीची आज मतमोजणी; दीड वर्षानंतर निकाल जाहीर होणार

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रक्रिया मार्गी; मुंबईत आठ समित्यांच्या निकालाकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) शिखर समिती आणि परिमंडळीय समिती निवडणुकीबाबतचा पेच अखेर सुटला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी पार पडणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. ही मतमोजणी महानगरपालिका समिती सभागृह क्रमांक १ व २, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, येथे दुपारी १२.०० वाजता होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. त्यात सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले होते. माननीय न्यायालयात दाखल विविध याचिकांमुळे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवण्यात आले होते. दरम्यान, सर्व मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी, मागील दीड वर्ष मतपेट्या मोहोरबंद अवस्थेत होत्या.

सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने (याचिका क्रमांक २९३३९/२०२४ व इतर) या प्रकरणावर अंतिम निकाल दिला. न्यायालयाने सन २०२४ मध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया ''विधिग्राह्य'' ठरवत, मतमोजणीवरील स्थगिती उठवली आहे. तसेच, विनाविलंब निकाल जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार आता मतमोजणी प्रक्रिया तातडीने करण्यात येणार आहे.

या निवडणुकीशी संबंधित सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, याचिकाकर्ते, संबंधित संघटना आणि इतर भागधारकांनी या प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT