Mumbai Groundwater Level Pudhari
मुंबई

Mumbai Groundwater Level: उपसा थांबवा, अन्यथा समुद्राचे पाणी शहराच्या भूजलात जाईल; केंद्रीय भूजल मंडळाचा पालिकेला अहवाल सादर

केंद्रीय भूजल मंडळाने दादर आणि मुलुंडमध्ये भूजल उपशावर बंदीची शिफारस केली असून कुलाब्यात निर्बंध सुचवले आहेत. समुद्राचे पाणी भूजलात शिरण्याचा धोका वाढला.

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड: केंद्रीय भूजल मंडळाने महापालिकेला दादर आणि मुलुंडमध्ये भूजल उपसा करण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. कुलाबा परिसरातील भूजल उपशावरही निर्बंध घालण्याची सूचना केली आहे.

केंद्रीय भूजल मंडळाने मुंबईसाठी जलस्तर व्यवस्थापन योजना तयार करून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई महापालिकेकडे सादर केली.

या अहवालात शहराच्या भूजलात समुद्राचे पाणी शिरण्याच्या धोक्यावर प्रकाश टाकण्यात आला असून, हा धोका कुलाबा, फोर्ट, दादर, माहीम आणि मुलुंड पूर्व यांसारख्या भागांमध्ये अधिक तीव्र असल्याचे नमूद केले आहे.

अहवालानुसार, फोर्ट आणि कुलाबा येथे ५०० हून अधिक भूजल स्रोत आहेत. दादर आणि माहीमच्या पूर्व भागात ४०० हून अधिक आहेत. मुलुंड पूर्वमध्ये तुलनेने कमी भूजल स्रोत आहेत. मुंबईत विहिरी आणि बोअरवेलसह १७ हजारांहून अधिक भूजल स्रोत आहेत.

‘मुंबई शहराच्या दक्षिणेकडील कुलाबा फोर्ट परिसरात ७१ मीटर इतक्या कमी खोलीवर खारे पाणी आढळून आले आहे. मुलुंड पूर्व, शिवाजी पार्क, दादर आणि माहीम येथे उच्च-खारटपणाचे क्षेत्र आढळले आहे. शिवाजी पार्कमध्ये १८.५-१९ मीटर व ३६-३७ मीटरवर खारे पाणी आढळले आहे,’ असे अहवालात म्हटले आहे.

केंद्रीय भूजल मंडळाच्या शिफारशींनुसार, मुंबई महापालिकेने २०२४ मध्ये व्यावसायिक वापरासाठी भूजल उपसा करण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. मात्र, ही मार्गदर्शक तत्त्वे सध्या स्थगित ठेवण्यात आली आहेत. केंद्रीय भूजल मंडळाने मुंबईसाठी ७६ कोटी रुपयांची भूजल पुनर्भरण आणि पर्जन्यजल व्यवस्थापन योजना प्रस्तावित केली आहे.

फोर्ट कुलाबा, शिवाजी पार्क, माहीम, मुलुंड पूर्व हे किनारपट्टीचे भाग आहेत. पायाच्या कामादरम्यान योग्य प्रक्रिया न केल्यास, खारट पाणी संपूर्ण संरचनेला हानी पोहोचवू शकते. तसेच, वाढत्या क्षारतेमुळे जुन्या बांधकामांनाही नुकसान पोहोचू शकते.
विक्रम तांबवेकर, स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग तज्ज्ञ
मी अजून अहवाल वाचलेला नाही. आम्ही संपूर्ण शहरात भूजल पुनर्भरण प्रकल्पावर काम करत आहोत. पुढील पावसाळ्यापर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याची आमची योजना आहे.
- डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT