नवी मुंबई : राजेंद्र पाटील
1 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या दीड महिन्यांत सोने तोळ्यामागे तब्बल 23 हजार रुपयांनी महाग झाले. बुधवारी जळगाव सुवर्णनगरीत सोने प्रतितोळा 1 लाख 41 हजार 980 रुपयांवर पोहोचले, तर या प्रचंड दराला मागे टाकत मुंबई सराफ बाजारात तोळ्याला 1 लाख 61 हजार रुपये मोजावे लागले. त्यात जीएसटी, घडणावळीसह हा दर 1 लाख 75 हजार 830 रुपयांवर पोहोचला.
मुंबई सराफ बाजारात एकाच दिवसात सोने तोळ्यामागे 10 हजार रुपयांनी वधारले आणि ग्राहकांनी अक्षरशः बाजारपेठेकडे पाठ फिरवली. मुंबईत सराफात दररोज सरासरी 100 ते 150 कोटींची उलाढाल होते. तिथे बुधवारी दिवसभरात सुमारे 50 कोटींची उलाढाल झाली असावी, असे इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीला सांगितले.
जानेवारीत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत तोळ्याला जीएसटी, घडणावळीसह 1 लाख 52 हजार 140 रुपये ग्राहकांना मोजावे लागले. बुधवारी 21 जानेवारीला हा दर मुंबईत 10 हजारांनी, तर सुवर्णनगरी जळगावात 11 हजार रुपयांनी वधारला. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सोने एका दिवसात तोळ्यामागे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महागले. दिवसभरात ही चढ-उतार सराफ बाजारात सुरू होती.
मकरसंक्रांतीनंतर सोने बाजाराला आलेली झळाळी कमी होण्याची चिन्हे नाहीत. फेब्रुवारी अखेरपर्यंत सोने 1 लाख 70 हजार रुपये तोळे तर चांदी 2 लाख 75 हजार रुपये किलोपर्यंत पोहोचेल, असेही कुमार जैन म्हणाले.
चांदीही किलोमागे दहा हजार रुपयांनी महाग झाली असून मंगळवारी 20 जानेवारीला चांदीचा दर 2 लाख 25 हजार रुपये किलो होता. बुधवारी 21 तारखेला हाच दर 2 लाख 35 हजार रुपयांवर पोहोचला.