मुंबई : पार्टी करुन घरी जाताना मोबाईलवरुन झालेल्या वादातून एका 28 वर्षांच्या तरुणीला तिच्याच मित्राने कारने काही अंतर फरफटत नेले तसेच तिच्यावर जिवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेत ही तरुणी गंभीर जखमी झाल्याने तिला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी आरोपी मित्र विनित याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी विविध भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तक्रारदार तरुणी ही बोरिवली परिसरात तिच्या मैत्रिणीसोबत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. सध्या ती बोरिवलीतील एका खाजगी स्पामध्ये कामाला आहे.
बुधवारी 22 ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता ती कामावरुन घरी जात होती. यावेळी तिच्या काही मैत्रिणी एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्या होत्या. त्यांनी तिलाही पार्टीसाठी बोलाविले होते. त्यामुळे ती तिथे गेली . याच पार्टीमध्ये तिची विनित नावाच्या एका तरुणासोबत ओळख झाली होती.
गुरुवारी सकाळी सहा वाजता ते सर्वजण विनितच्या नेक्सॉन कारमधून घरी जाण्यासाठी निघाले होते. काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना कारमधून उतरविले. साडेसहा वाजता विनितसोबत असताना तिच्या मोबाईलची रिंग वाजली. यावेळी विनितने तिचा फोन घेण्याचा प्रयत्न केला. तिने मोबाईल देण्यास नकार देताच त्याने तिला बेदम मारहाण केली होती.
काही वेळानंतर त्याने तिचा मोबाईल घेतला, तो मोबाईल परत करत नव्हता. त्यामुळे ती त्याच्या कारच्या बोनेटवर बसली होती. यावेळी त्याने तिला खाली न उतरविता कार सुरु केली होती. कार वेगाने चालविल्याने ती कारमधून खाली पडली. तरीही त्याने कार न थांबविता तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
काही वेळानंतर त्याने कार तिच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. या अपघातामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर विनित तिला तिथे त्याच अवस्थेत टाकून पळून गेला होता. ही माहिती नंतर तिने तिच्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर तिने तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले.