मुंबई

Mumbai Gas Shortage: मुंबईत गॅस टंचाईचा फटका; 50% हॉटेल्स बंद, महानगर गॅसकडून 20% पुरवठा कपात

हॉटेल व्यवसाय ठप्प, मेनू कमी; वडापावपासून भाजीपाला बाजारापर्यंत मोठा परिणाम, नागरिकांना सिलिंडरसाठी रांगा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्यानंतर आता महानगर गॅसने हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पुरवण्यात येणाऱ्या गॅसमध्ये 20 टक्के कपात केल्याने हॉटेल मालक आणखी अडचणीत आले आहेत. आतापर्यंत मुंबईतील सुमारे 50 टक्के हॉटेल्स बंद झाली आहेत.

मुंबईतील सुमारे 35 टक्के हॉटेल्स महानगर गॅसवर अवलंबून आहेत. ही कपात झाल्यामुळे अनेकांनी मेनूला कात्री लावली तसेच अन्य पर्यायी इंधनाचा आधार घेतला आहे. दरम्यान, घरगुती ग्राहकांना अखंडित गॅसपुरवठा सुरू राहावा यासाठी व्यावसिकांच्या गॅसपुरवठ्यामध्ये कपात केल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. हॉटेल व्यावसायिकांबरोबरच औद्योगिक क्षेत्राला होत असलेला गॅस पुरवठा 50 टक्क्यांनी कमी केल्याचे महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील अनेक रेस्टॉरंटनी पर्यायी इंधनाचा मार्ग अवलंबल्याचे चित्र आहे. माटुंगा येथे अनेक रेस्टॉरंटमध्ये चुली आणि कोळशाच्या शेगड्यांचा आधार घेतला जात आहे. अनेक हॉटेल्समध्ये मेनूंची संख्या 50 वरून तब्बल 10 वर आली आहे.

चुलीवर पदार्थ बनवण्यात वेळ लागत असल्याने ग्राहकांना वेळेवर पदार्थ पुरवू शकत नसल्याचे अनेक हॉटेलचालकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांत व्यावसायिक सिलिंडर मिळेल, असे त्यांना गॅस एजन्सीकडून सांगण्यात येत आहे.

गोरेगाव चित्रनगरीला खाद्यान्न पुरवणारे व्यावसायिकदेखील गॅसच्या संकटामुळे हतबल झाले आहेत. मुंबईतील 50 टक्के हॉटेल्स बंद पडल्याने त्यांना होणाऱ्या भाजीपाला पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. मुलुंड भागातील भाजी विक्रेत्यांकडील मागणीमध्ये 70 टक्के घसरण झाली आहे.

मुंबईची ओळख असलेल्या वडापावलाही फटका

भांडुप : गॅस तुटवड्याचा फटका मुंबईची ओळख असलेल्या वडापाव ला देखील बसला आहे. वडापावचे दर 15 रुपयांपर्यंत ठिकाणी वाढले आहेत, तर बरेच ठिकाणी वडापाव विक्री बंद झाली आहे. मुंबई चा प्रसिद्ध भाऊ वडापाव ने या गॅस टंचाईमुळे मुंबईतील त्यांच्या सर्व शाखा बंद ठेवल्या आहेत. वडापाव निर्मितीसाठी लागणाऱ्या कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद असल्याने वडापाव निर्मिती ठप्प झाली आहे, त्यामुळे भाऊ वडापावच्या बाहेर दिवसभर शेकडो ग्राहकांना दुकान बंद असल्याची पाटी पाहून माघारी फिरावे लागत आहे.

घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा

कांदिवली :

एच पी गॅस कंपनीचे सिलिंडर बुकिंग करून सुद्धा डिलिव्हरी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर काळ्या बाजारात जास्त किमतीने विकले जात असल्याची शंका नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. एच पी च्या लालजी गॅस एजन्सीने अशोक नगर मनपा मैदानात गॅस सिलेंडर वितरण केल्याने, भर उन्हात देखील नागरिकांनी लांबच लांब रांगा लावून गॅस सिलेंडर घेतले.

हनुमाननगरमध्ये नागरिकांच्या रांगा लागत असल्याने तसेच काळा बाजार वाढल्याने एजन्सीने घरपोच डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला. कांदिवली पूर्व येथील ऑफिसमधून सिलिंडर घेऊन जावेत असे आवाहन गॅस एजन्सीने केले.

एजन्सी कार्यालयात प्रचंड गर्दी होत असल्याने सोमवार दिनांक 16 मार्च रोजी अशोक नगर मनपा मैदानात 3 एच पी चे ट्रक खाली केले.मैदानात प्रचंड गर्दी झाल्याने, पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले. नागरिकांनी विशेषतः महिलांनी दोन तास आपल्या मुलांसह भर उन्हात रांगा लावत गॅस सिलेंडर घेतला. रिक्षा चालकांनी गॅस सिलेंडर रिक्षातून घेऊन जाण्यासाठी 50 ते 100 रुपये आकारले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT