Mumbai Ganeshotsav Rules Pudhari
मुंबई

Mumbai Ganeshotsav Rules: मुंबईत ९ ते २३ सप्टेंबर१५ दिवस जमावबंदी; मिरवणुका, लाऊडस्पीकर आणि फटाक्यांवर बंदी

गणेशोत्सवात मुंबई पोलिसांची कडक नजर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. गणेशोत्सवात प्रतिबंधात्मक उपायांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुंबई पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष खबरदारी म्हणून मिरवणुका काढण्यासह लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्यवृंद (बँड) आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ९ सप्टेंबर रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून २३ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१) आणि ३७(३) अन्वये हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे.

या कालावधीत कोणत्याही व्यक्ती किंवा समूहाला मिरवणूक काढता येणार नाही. मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक साधने, वाद्ये, बँड तसेच फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच मानवी जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

नियमित कार्यक्रमांना सूट

विवाह समारंभ, अंत्यसंस्कार व दफनविधीसाठीच्या मिरवणुका, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या कायदेशीर बैठका यांना आदेशातून सूट देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे व सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी होणारे कार्यक्रम, सरकारी व निमशासकीय कार्यालयांचे कामकाज, न्यायालये, शाळा-महाविद्यालयांतील शैक्षणिक उपक्रम तसेच कारखाने, दुकाने आणि आस्थापनांमधील नियमित कामकाजही सुरू राहणार आहे. पोलीस आयुक्त, मुंबई किंवा संबंधित विभागीय पोलीस उपायुक्तांनी परवानगी दिलेल्या सभा व मिरवणुकांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT