Mumbai Ganesh Mandap Safety Pudhari
मुंबई

Mumbai Ganesh Mandap Safety: मंडपांच्या वीजजोडण्यांचे ऑडिट कधी? सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गणेशोत्सवातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेश मंडपांच्या तात्पुरत्या वीजजोडण्यांची फेरतपासणी आणि सुरक्षितता ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा BESTकडून १,५५२ गणेश मंडळांना तात्पुरता वीजपुरवठा करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

महेश पांचाळ

मुंबई: गणेशोत्सवातील लाखोंच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेश मंडपांच्या तात्पुरत्या वीजजोडण्यांची फेरतपासणी आणि सुरक्षिततेचे ऑडिट (तपासणी) करण्याची गरज निर्माण झाली आहे. काळाचौकी येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू आणि चौघे जखमी झाल्यानंतर काही तासांतच लालबागच्या राजाच्या मंडपातील फीडर पिलरमध्ये किरकोळ शॉर्टसर्किट झाले.

या दोन्ही ठिकाणी असलेल्या मोठ्य गर्दीमुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विजेच्या ठिणग्या उडाल्याने दर्शनाच्या रांगेतील भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

यंदा मुंबई शहरा बेस्टकडून १ हजार ५५२ गणेश मंडळांना तात्पुरता वीजपुरवठा करण्यात आला आहे. परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून वीजजोडणी, तपासणी, वायरिंगची क्षमता आणि इएलसीबी चाचणी यांसह आवश्यक सुरक्षितता उपायांची पूर्तता करणे अपेक्षित आहे, असे मंडळांना कळविण्यात आले आहे.

मात्र, जोडणी मिळाल्यानंतर मंडपात करण्यात येणारे अतिरिक्त वायरिंग, स्टॉलसाठी घेतलेल्या जोडण्या आणि वाढीव वीजभार यांची सुरक्षितता तपासणेही आता तितकीच महत्त्वाची बाब बनली आहे.

तात्पुरती वीज जोडणी देताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जाते. मात्र, जोडणी झाल्यानंतर मंडपातील अतिरिक्त वायरिंग, लोंबकळणाऱ्या किंवा उघड्या तारा, अनधिकृत जोडण्या आणि वाढीव वीजभाराची काळजी घेणे ही मंडळांची जबाबदारी आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने विद्युत सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, याकडे गणेश मंडळानी लक्ष देण्याची गरज असल्याचे बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गर्दीबरोबर आपत्कालीन मार्गाचाही प्रश्न

काळाचौकीतील दुर्घटनेवेळी गर्दीमुळे रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यात अडथळा आला. जखमींना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उचलून रुग्णालयात नेले. त्यामुळे लालबाग-काळाचौकी-चिंचपोकळी परिसरात रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासाठी आपत्कालीन मार्ग कायम मोकळा ठेवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रांगा एकमेकांत मिसळल्याने गोंधळ

मंडपाकडे जाणारी आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची रांग एकमेकांत मिसळल्याने गोंधळाची आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग स्वतंत्र असणे गरजेचे असल्याचे सांगताना काळाचौकीतील दुर्घटनेत जखमी झालेल्या तन्वी हांडे हिने गर्दीच्या नियोजनाबाबत अनुभव सांगितला.

‘वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र नियोजन’

लालबाग-परेल परिसरातील वाहतूक नियोजनाबाबत वाहतूक पोलिसांकडून स्वतंत्र उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, प्रमुख ठिकाणी वाहतूक नियंत्रण आणि स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे. कॉटन ग्रीन येथे १ हजार २०० वाहनांसाठी तात्पुरते पार्किंग केंद्र उभारण्यात आले अशी माहिती सह पोलीस आयुक्त, (वाहतूक)सत्यनारायण चौधर यांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांकडून गर्दी व्यवस्थापनासाठी सुमारे सहा हजार स्वयंसेवक आणि ५५ वॉचटॉवरची मदत घेतली जाणार आहे.

वीजचोरांवर कारवाई होणार

लालबाग काळाचौकी दुर्घटनेनंतर बेस्ट वीज विभागाकडून अवैध पद्धतीने विद्युत पुरवठा किंवा प्रवाह घेणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने आणि चोरी करून वीज घेत असेल तर त्यावर बेस्टकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचे बेस्ट विद्युत उपक्रम मुख्य अभियंता सुरेश मकवाना यांनी सांगितले.

काळाचौकीत अनधिकृत जोडणीचा मुद्दा

काळाचौकीतील दुर्घटनेनंतर बेस्टने संबंधित गणेशोत्‍सव मंडळाला नोटीस बजावली आहे. प्राथमिक पाहणीत मंजूर तात्पुरत्या वीजमीटरमधून स्टॉलला अनधिकृत जोडणी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या जोडणीची माहिती नसल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT