मुंबई: श्रावणातील पहिला सोमवार आणि त्यातच नागपंचमी हा सण आहे.देव पूजेसाठी नैसर्गिक फुले,पुष्पहार,दुर्वा,बेल पत्र आदी साहित्य खरेदी करिता मुंबईतील दादर,भुलेश्वर फुलबाजारसह उपनगरमधील फूल बाजारात रविवारी दिवसभर ग्राहकांची लगबग होती.
गेल्या दोन महिन्यापूुर्वी शेतकऱ्यांनी फूलांची लागवड केल्याने नवीन फुलांची आवक श्रावणाच्या सुरुवातीला सुरू झाली आहे. बाजारपेठेत सर्वप्रकारच्या फुलांची आवक वाढली असली तरी फुलांचे दर कमी झालेले नाहीत.दर स्थिर आहेत.
श्रावण व सणामुळे ग्राहक इतर वेळेपेक्षा सरासरी २५ ते ३० टक्के वाढला असल्याचे दादर मधील फुल विक्रेत्यांनी सांगितले.एकंदरीत श्रावण व सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गर्दी होती.
श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हा सण आहे. यासाठी दादर, भायखळा, भुलेश्वर या शहरात तर उपनगरातील मालाड, बोरिवली, घाटकोपर,भांडुप, मुलुंड आदी बाजार पेठेत रविवारी दिवसभर ग्राहकांची फुल, पुष्पहार, चाफ्याची वेणी, दुर्वा, बेलपत्र खरेदी साठी ग्राहकांची लगबग सुरु होती. त्याचबरोबर एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांनी फूलांची लागवड केली होती.त्यामुळे बाजार पेठेत नवीन फुलांची आवक आली आहे.
फुलांची आवक मोठ्या प्रमाणात आले असले तरी फुलांचे दर स्थिर आहेत. फुल बाजारात झेंडू (पिवळा व केशरी ) प्रतिकिलो ३० ते पासून ते ६० रुपये पर्यंत, शेवंती ओली ६० रूपये, शेवंती सुकी ८० ते १०० रुपये, निशिगंधा (गुलछडी)१५० ते १६० रुपये, मोगरा ५०० ते ६०० रुपये,
मोगरा कोईमतूर ३०० ते ४०० रुपये, कण्हेर २०० रुपयापासून ते २८० रुपये पर्यंत, गुलाब फूल १०० ते १२० रुपये प्रति किलो तर
चाफा १०० रुपयांना १०० नग आणि दुर्वा पेंढी २० रुपये (५० रुपयांना तीन पेंड्या) बेलपत्र दहा रुपये,लहान पुष्पहार ४० रुपयाला एक तर मोठा पुष्पहार १०० रुपयांना, चाफ्याची वेणी १० रुपये असे दर होते.
केळीचे पान १० रुपयाला..
श्रावण महिन्यात एका सोमवारी केळीच्या पानावर उपवास सोडण्याची प्रथा व परंपरा आहे.त्यानुसार अनेक जन पानावर उपवास सोडतात.आज महागाई काळात केळीचे पान १० रुपयांना झाले आहे.ते घेण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होती.
पाऊस ओसरल्याने व तीन महिन्यापूर्वी फुलांची लागवड झाली होती.त्यामुळे सर्वप्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. घाऊक विक्रेते हे थेट शेतकऱ्यांशी जोडून फुले खरेदी करतात.श्रावण व सणाच्या काळात सरासरी २५ ते ३० टक्के जादा ग्राहक इतर वेळेपेक्षा वाढतात.- दीपक रोकडे, फुल विक्रेता, माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल बाजार दादर (पश्चिम )