मुंबई: सध्या उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे फूल शेतीवर परिणाम होत आहे. तापमान वाढल्याने नैसर्गिक फुलांची उत्पादनक्षमता कमी झाली असून मुंबईतील फूल बाजारात सर्वप्रकारच्या फुलांची आवक घटली आहे. घाऊक बाजारात फुलांच्या दरात प्रतिकिलो सरासरी 20 रुपये वाढ झाली आहे. फुलांची झालेली दरवाढ व सण, लग्नसराई कमी झाल्याने फुलांच्या विक्रीत घट झाल्याचे दादरमधील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
मुंबईतील फुलांची मोठी बाजारपेठ म्हणून दादर फूल बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दादरबरोबर भायखळा याठिकाणी फुलांची बाजारपेठ आहे. फूल बाजारातील बहुतांश नैसर्गिक फुलांचे घाऊक विक्रेते हे थेट शेतकऱ्यांकडून फुले घेतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोळनेर, सातारा जिल्ह्यातील कास पठार व सांगली या जिल्ह्यांत फुलांचे उत्पादन होते.
दरम्यान, दोन महिन्यांपासून प्रचंड उष्णतेमुळे फूल शेतीवर परिणाम झाला असून फुलांचे उत्पादन कमी होत चालले आहे. त्यामुळे मुंबईतील फूल बाजारांत सर्वप्रकारच्या फुलांची आवक घटली असून त्याचा दरावर परिणाम होत आहे.
दुसरे म्हणजे, तापमानात झालेली वाढ व पाण्याच्या कमतरतेमुळे दोन दिवसांतच फुले सुकतात. त्याचा फटका फूल विक्रेत्यांना बसत आहे. जर उष्णतेची लाट अशीच राहिली, तर पुढील काळात फुलांच्या दरामध्ये आताच्या दरापेक्षा प्रतिकिलो आणखी 10 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.
दृष्टिक्षेपात : प्रतिकिलो दर
झेंडू (पिवळा व केशरी): पूर्वी 20 ते 30 रुपये, सध्या 40 ते 50 रुपये
शेवंती: पूर्वी 40 ते 60 रुपये, सध्या 80 ते 120 रुपये
मोगरा: पूर्वी 300 ते 400 रुपये, सध्या 600 ते 800 रुपये
निशिगंधा: पूर्वी 60 ते 80 रुपये, सध्या 100 ते 120 रुपये
गुलाब: पूर्वी 60 ते 80 रुपये, सध्या 100 ते 120 रुपये
याबाबत दादर येथील माँसाहेब मीनाताई फूल बाजारातील विक्रेते म्हणाले, दादर फूल बाजारात यापूर्वी दिवसाला 30 ट्रक सर्व प्रकारची फुले यायची. पण, आता दिवसाला 20 ट्रक येतात. फुलांची आवक कमी झाल्याने दरामध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर सण व लग्नसराई नसल्याने ग्राहकांकडून फुलांची म्हणावी तशी खरेदी होत नाही.- दीपक रोकडे, फूल विक्रेते, माँसाहेब मीनाताई फूल बाजार, दादर