राजेश सावंत
मुंबई: दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने ॲक्शन प्लॅन तयार केला असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबई शहरावरील तुंबईचा शिक्का कायमस्वरुपी मिटविण्यासाठी आजवर महापालिका प्रशासनाचे १६ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च झाला असून आता तुंबई कशामुळे होते, हे शोधण्यासाठी महापालिका प्रशासन सल्लागाराची नियुक्ती करणार आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी महापालिका सल्लागाराला ११० कोटी रुपये मोजणार आहे.
पूरमुक्त मुंबईसाठी तीन पॅकेजमध्ये काम होणार आहे. तीन टप्प्यांमध्ये हा अभ्यास करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ३३ कोटी, दुसऱ्या टप्प्यासाठी ३२ कोटी तर तिसऱ्या टप्प्यासाठी ४५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई शहर, उपनगरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नेमकी पाणी तुंबण्याची कारणे शोधून तुंबई या प्रतिमेपासून मुक्त होण्यासाठी महापालिकेने एकात्मिक शहरी पूर जोखीम व्यवस्थापन प्रकल्पाचे डिझाईन व तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये कोसळलेल्या महाप्रलयकारी पावसामुळे संपूर्ण मुंबई शहर जलमय झाले होते. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील पूरसदृश परिस्थिती कमी करण्यासाठी मिठी नदीच्या रुंदीकरणासह अन्य नदी नाल्यांचे रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला.
हिंदमाता, सायन गांधी मार्केट, मिलन सबवे येथे पावसाळ्यात तुंबणारे पाणी साठवणूकसाठी भूमिगत टाकीसह हाजीअलीसह पाच ठिकाणी शक्तिशाली पंपिंग स्टेशन उभारली. या सर्व उपाय योजनेसाठी आतापर्यंत १६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे.
अहवालानंतरच उपाययोजनांची अंमलबजावणी
याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले. प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर अहवालात सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.
अहवालात पूरसदृश परिस्थितीची सखोल माहिती
एकात्मिक शहरी पूर जोखीम व्यवस्थापन प्रकल्पाचे डिझाईन आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केल्याने मुंबईतील पूरसदृश्य परिस्थितीची सखोल माहिती उपलब्ध होणार आहे. पारंपारिक अभ्यास पद्धतींमध्ये केवळ पूर नियंत्रण यावर भर दिला जातो. परंतु एकात्मिक व्यवस्थापनात पुराचे कारण, त्याचा प्रभाव, आणि हवामान बदल या सर्वांचा एकत्रित विचार केला जाणार आहे.
महापालिकेने आजवर केलेल्या उपाययोजना
हाजी अली, ब्रिटानिया, वरळी लव्हग्रोह, क्लिव्हलँड, गझदरबंद येथे शक्तिशाली पंप (प्रति सेकंद ६ लिटर पाणी उपसा करण्याची क्षमता)
हिंदमाता, सायन, गांधी मार्केट व मिलन सबवे भूमिगत पाणी साठवणूक टाकी
पर्जन्य जलवाहिन्यांचे आकारमान वाढवणे
मिठीसह अन्य नद्या व नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण
प्रतिवर्षी नालेसफाई
रस्त्यालगतच्या गटारांची रुंदी वाढवणे