मुंबई: स्वच्छता, अन्न हाताळणी, साठवणूक आणि तापमान नियंत्रणातील गंभीर त्रुटी मुंबईतील नामांकित अन्न आस्थापनांच्या अंगलट आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने २० आणि २१ ऑगस्ट रोजी केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( एमसीए) पाच अन्न आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी निलंबित केली. त्याचबरोबर कुर्ला येथील मध्यान्ह भोजन केंद्र, माहीममधील लेनेक्सिस फूडवर्क्स, शिवाजी पार्क येथील कॅफे कॅडेल आणि मुलुंडमधील चायना टाउन फास्ट फूड सेंटर यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
बांद्रा-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ‘परमिट रूम’, ‘पॅव्हिलियन’, ‘मेडिटेरेनियन’, ‘ओरिएंटल स्विंग’ आणि ‘क्लबवे अँड पेस्ट्री काउंटर’ या पाच अन्न आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळले.
‘परमिट रूम’मध्ये स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटरमध्ये बर्फ साचलेला, प्रवेशद्वाराजवळील फरशी घसरडी व अस्वच्छ, अन्न परवाना दर्शनी भागात प्रदर्शित नसणे, तापमान नियंत्रणातील त्रुटी, खाद्यतेलाची नियमित तपासणी न करणे, अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याचे आवश्यक प्रमाणपत्र नसणे आणि काही कच्चा माल खराब अवस्थेत असल्याचे आढळले.
‘पॅव्हिलियन’मध्ये रेफ्रिजरेटर अस्वच्छ, थंड साठवण कक्षात खाद्यपदार्थांची योग्य विभागणी नसणे, कच्च्या मालाची तपासणी न करणे, कृषीजन्य कच्चा माल खराब अवस्थेत असणे तसेच गोठविलेले पदार्थ योग्य पद्धतीने वितळविले जात नसल्याचे आढळले.
‘मेडिटेरेनियन’मध्ये अन्न परवाना प्रदर्शित न करणे, खाद्य उपकरणांची अस्वच्छता, अपुरी निर्जंतुकीकरण प्रक्रिया, खाद्यपदार्थांचे अयोग्य शीतकरण, खाद्यतेलाची तपासणी न करणे, कच्च्या मालाची तपासणी न करणे आणि अन्न पुन्हा गरम करण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन आढळले.
‘ओरिएंटल स्विंग’मध्ये शीतकरण यंत्रणेचे योग्य तापमान नियंत्रण नसणे, स्वयंपाकघरातील फरशी अस्वच्छ असणे, छतावरील रंग व गिलावा निघालेला असणे, उपकरणांचे अपुरे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी आढळल्या.
तर ‘क्लबवे अँड पेस्ट्री काउंटर’मध्ये अपुरी कामाची जागा, कच्च्या मालाची अस्वच्छ साठवणूक, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून हातमोज्यांचा वापर न करणे आणि कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी अपुरी व्यवस्था आढळली.
शिवाय ‘शिर्के इन्फ्रास्ट्रक्चर’ या संस्थेकडे वैध अन्न व्यवसाय परवाना नसतानाही तिच्याकडून अन्न व्यवसाय करून घेतला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.
मध्यान्ह भोजन केंद्राला केवळ ४८ टक्के गुण
कुर्ला येथील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड या मध्यान्ह भोजन केंद्राची तपासणी केली असता ११२ पैकी केवळ ५३ गुण मिळाले. म्हणजेच या केंद्राला ४८ टक्के गुण मिळाले असून तपासणीचा निष्कर्ष ‘नियमांचे पालन नाही’ असा नोंदविण्यात आला.
स्वयंपाकघरात घाण व अन्नाचे अवशेष, तुटलेल्या फरशा, पाणी साचलेले, गंजलेली साठवण व्यवस्था, अस्वच्छ भांडी, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदींचा अभाव, अपुरी हात धुण्याची व्यवस्था आणि तापमान नियंत्रणातील त्रुटी आढळल्या.
माहीम येथील लेनेक्सिस फूडवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अपुरी वायुवीजन व्यवस्था, धूरनलिका व गाळण्यांवर चरबीचे थर, फरशीवर साचलेले पाणी, गंजलेली उपकरणे, पाण्याच्या गुणवत्तेच्या नोंदींचा अभाव आणि कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या स्वच्छता सुविधा आढळल्याने अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
मुलुंडमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव
मुलुंड पूर्वेतील चायना टाउन फास्ट फूड सेंटरमध्ये तर गंभीर त्रुटी आढळल्या. खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग आणि अजिनोमोटोचा अतिरेकी वापर, वारंवार वापरल्याने काळवंडलेले खाद्यतेल, स्वयंपाकघरात झुरळांचा प्रादुर्भाव, जिन्याखाली उघड्यावर ठेवलेला शिजवलेला भात, गंजलेली भांडी व चाकू, शाकाहारी-मांसाहारी पदार्थांमध्ये दूषित होण्याचा धोका आणि सांडपाणी निचऱ्याची अपुरी व्यवस्था आढळली. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या आस्थापनेची नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली.