Mumbai FDA action pudhari photo
मुंबई

Mumbai FDA action : उंदीर-झुरळांमुळे दोन हॉटेलांचे परवाने निलंबित

परवाना निलंबित असताना अन्न उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण बंद ठेवण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंटमधील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली आहे. मालाडमधील हॉटेल राधा आणि कुर्ल्यातील जनता तवा अँड ग्रिल या दोन आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.

१८ ऑगस्टला एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाची तपासणी केली. यावेळी स्वयंपाकघरात जिवंत उंदीर आढळले. उघड्या ड्रेनेजमधून मोठा उंदीर स्वयंपाकघरात येताना दिसला. तसेच छताजवळ आणखी एक उंदीर आढळला. ड्रेनेज व्यवस्था अस्वच्छ आणि उघडी होती. पीठ मळण्याच्या यंत्रावर जिवंत झुरळे आढळली. स्वयंपाकघरात पाणी साचणे, ग्रीसचा थर आणि ड्रेनेजमधून गळती यामुळे दुर्गंधी व अत्यंत अस्वच्छ वातावरण निर्माण झाले होते.

या गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हॉटेल राधाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. परवाना निलंबित असताना अन्न उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कच्चे मांस अस्वच्छ पद्धतीने साठवले

कुर्ल्यातील जनता तवा अँड ग्रिलच्या तपासणीत कच्चे मांस आणि पोल्ट्री अयोग्य पद्धतीने साठवलेले आढळले. रेफ्रिजरेटेड व फ्रोझन साठवणुकीच्या तापमानाच्या नोंदी नव्हत्या. अन्न, पॅकेजिंग साहित्य आणि बिगर-अन्न वस्तूंची अस्ताव्यस्त साठवणूक करण्यात आली होती. अन्नाच्या संपर्कातील भांडी व उपकरणांवर ग्रीस, अन्नाचे अवशेष आणि कार्बनचा थर साचला होता. ग्रिलवर जळलेल्या अन्नाचे अवशेषही मोठ्या प्रमाणात आढळले.

पाणी आणि अन्नपदार्थांच्या प्रयोगशाळा तपासणीच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या. या गंभीर त्रुटींमुळे जनता तवा अँड ग्रिलचा एफएसएसएआय परवाना निलंबित करण्यात आला आहे. एफडीएच्या राज्यव्यापी मोहिमेत मुंबईत प्रतिबंधित पान मसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखूविरोधातही कारवाई करण्यात आली. मुंबई विभागात २ एफआयआर दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली असून, सुमारे १० लाख ५७ हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.

  • हॉटेल राधाच्या स्वयंपाकघरात उघड्या ड्रेनेजमधून उंदीर येताना आढळला, तर पीठ मळण्याच्या यंत्रावर झुरळांचा वावर आढळला.

  • अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT