Mumbai FDA Action pudhari photo
मुंबई

Mumbai FDA Action : एफडीएकडून मुंबईतील पाच आस्थापनांचे परवाने निलंबित

खाद्यपदार्थांच्या साठवणुकीपासून कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेपर्यंत गंभीर त्रुटी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या मुंबईतील पाच आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. तपासणीदरम्यान अस्वच्छ स्वयंपाकघर, उघड्यावर ठेवलेले अन्न, गंजलेली शीतकरण यंत्रणा, कीटकांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य पदार्थ, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न करणे तसेच आवश्यक नोंदींचा अभाव अशा गंभीर त्रुटी आढळल्या. या पार्श्वभूमीवर संबंधित पाचही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

बारिस्टा कॉफी कंपनीवर कारवाई

शिवाजी पार्क येथील बारिस्टा कॉफी कंपनी लिमिटेडच्या तपासणीत रेफ्रिजरेटर आणि फ्रीझर गंजलेल्या, खराब व अस्वच्छ अवस्थेत आढळले. तापमानाचे योग्य नियंत्रण नव्हते. आईस्क्रीम, कापलेल्या भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवण्यात आले होते. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे योग्य अलगीकरण केलेले नव्हते.अन्न व पाण्याच्या तपासणीचे अहवाल, उपकरणांच्या कॅलिब्रेशनच्या नोंदी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीयप्रमाणपत्रे आणि प्रशिक्षणाच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे आढळून आले.

सँडी दा ढाब्यात उंदीर-माशांचा वावर

मालाडच्या मढ येथील सँडी दा ढाबामध्ये स्वयंपाकघर आणि परिसरात तीव्र अस्वच्छता आढळली. छताचा प्लास्टर आणि रंग निघालेला असून तो अन्नपदार्थांवर पडण्याचा धोका होता. याशिवाय उंदीर आणि माशांचा वावर आढळला. तीन फ्रीझर अस्वच्छ अवस्थेत होते, तर चिकन अस्वच्छ पद्धतीने साठवण्यात आले होते.

शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचे योग्य अलगीकरण नसणे,अंड्यांची टरफले व कचरा न हटवणे, तसेच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे, हातमोजे आणि खरेदी-विक्रीची नोंद उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले.

फ्रीझरमध्ये आढळून आल्या मृत माश्या

भांडुप येथील राजिडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डीप फ्रीझर अत्यंत घाणेरडा असल्याचे आढळून आला. फ्रीझरमध्ये मृत माश्या आढळल्या, तर काही अन्नपदार्थांची पाकिटे थेट जमिनीवर ठेवण्यात आली होती. दुकानात माशांचा प्रादुर्भाव आणि मोठ्या प्रमाणात धूळ-घाण साचलेली होती.

जमिनीची लादी तुटलेली असून रॅक व पॅलेट्स गंजलेले होते. तेलाचे डबे गंजलेले व छिद्रयुक्त आढळले. शीतगृह आणि फ्रीझरमधील तापमानाच्या नोंदी तसेच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल उपलब्ध नव्हते.

फूड हबमध्ये सापडले मुदतबाह्य मसाले

मालाडमधील फूड हब या आस्थापनात अवघ्या २५० चौरस फुटांच्या जागेत मोठी गर्दी आणि अस्वच्छता आढळली. फ्रीझरमध्ये बर्फ साचलेला होता. मोमोज, लाल मिरची सॉस आणि मेयोनीजच्या डब्यांवर उत्पादन व वापराची अंतिम तारीख नमूद केलेली नव्हती.

बटरऐवजी 'डिलिशस फॅट स्प्रेड' चा वापर केला जात असल्याचे आढळले. मुदतबाह्य मसालेही साठवून ठेवले होते. उघडी गटारे, साचलेले पाणी, झुरळे, माश्या आणि मुंग्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक कीटक नियंत्रणाची व्यवस्था नव्हती. सात कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नव्हती.

अन्नपदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्या आस्थापनांनी स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि आवश्यक नोंदींचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

दरम्यान,अन्न व औषध प्रशासनाच्या सततच्या कारवाईंमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

मिल्कोज डेअरीचा परवाना वर्गच चुकीचा

कांदिवली पूर्वेतील मिल्कोज डेअरी प्रॉडक्ट्स प्रा. लिमिटेडकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक उत्पादक वर्गवारीचा परवाना असणे अपेक्षित असताना चुकीच्या वर्गवारीचा परवाना असल्याचे तपासणीत आढळले.आस्थापनातील भिंती व छत अस्वच्छ होते. पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती राहण्याची व्यवस्था नव्हती. दरवाजा व्यवस्थित बसवलेला नसल्याने माशा व कीटकांचा प्रवेश होण्याची शक्यता होती. कीटक नियंत्रणाची योग्य व्यवस्था तसेच उपकरणांच्या स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कॅलिब्रेशन आणि देखभालीच्या नोंदी उपलब्ध नसल्याचेही प्रशासनाच्या तपासणीत समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT