Mumbai FDA Action pudhari photo
मुंबई

Mumbai FDA Action: रंगाचा संशय असलेले वेफर्स, फरसाण, जिलेबी केली जप्त; एफडीएचा दणका

अस्वच्छतेमुळे चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत कारवाईचा दणका दिला. कांदिवली पूर्व आणि पश्चिम परिसरात रंगाचा संशय असलेले वेफर्स, फरसाण, जिलेबी आणि हलवा जप्त करण्यात आला.

तसेच, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कांदिवली पूर्व येथील श्री सद्गुरू फूड्स या आस्थापनातून स्पायसी बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, लसूण शेव, शेंग भुजिया आणि शेजवान स्टिक्स असा एकूण २२ हजार ४५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

या पदार्थांमध्ये अनधिकृत रंगांचा वापर झाल्याचा संशय आहे. कांदिवली पश्चिम येथील श्री गणेश फरसाण अँड स्वीट मार्टमधून रंग आढळलेली जिलेबी आणि महाराजा हलवा, असे तीन हजार १५० रुपये किमतीचे पदार्थ जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले. दोन्ही कारवायांमध्ये एकूण २५ हजार १९५ रुपयांचे अन्नपदार्थ जप्त केले.

गंजलेली भांडी- रॅक आढळले

तपासणीत अस्वच्छ स्वयंपाकघर आणि ड्रेनेज, गंजलेली भांडी व रॅक, परत आलेला पाव ताज्या पावात मिसळणे, तापमानाच्या अपुऱ्या नोंदी, कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव आणि मिठाईमध्ये अनधिकृत खाद्यरंगांचा वापर अशा त्रुटी आढळल्या. याप्रकरणी बोरीवलीतील अरबियन शॅवर्मा कॅफे अँड फास्ट फूड, माहिममधील नाथ फास्ट फूड, नायर ऑन फायर क्लाउड किचन आणि बिकानेर स्वीट्स अँड नमकीन या आस्थापनांविरोधात कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT