water crisis file photo
मुंबई

Mumbai Water Crisis: मुंबईवर ३०% पाणीकपातीचे सावट; तलावांमध्ये अवघा ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक

येत्या चार ते पाच दिवसांत तानसा तलावही पूर्णपणे आटेल असे सांगण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात अवघा ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे. येणाऱ्या आठवडाभरात पाऊस पडला नाही तर पाणीकपातीमध्ये २५ ते ३० टक्के वाढ करावी लागेल, अशी शक्यता पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जूनमध्ये पाऊस दाखल होईल असे अपेक्षित होते. परंतु जूनची २० तारीख आली तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पाणीसाठ्यात अजूनच घट झाली आहे. काही आठवड्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला. तर येत्या चार ते पाच दिवसांत तानसा तलावही पूर्णपणे आटेल असे सांगण्यात येत आहे.

तानसा तलावामध्ये जेमतेम तीन टक्के म्हणजेच अवघा ५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला सर्वाधिक दररोज १,८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाण्याची पातळीही घसरत चालली आहे. या तलावात अवघा ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मध्य वैतरणा तलावतही जेमतेम १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

नॅशनल पार्कमधील विहार तलावामध्ये ४१ टक्के पाणीसाठा दिसत असला तरी, या तलावाचे पाणलोट क्षेत्र कमी असल्यामुळे ११,४४८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. तुळशी तलावातही २२ टक्के पाणीसाठा शिल्लक दिसला असला तरी, तलावामध्ये १७९२ दशलक्ष लिटर इतकेच पाणी शिल्लक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

सध्या ६ तलावांमध्ये १ लाख ३० हजार दशलक्ष लीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक असून हा साठा जेमतेम २० ते २५ दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत तलाव क्षेत्रात पाऊस झाला नाही तर, मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाई ओढावू शकते अशी भीती जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तलाव आटू लागल्यामुळे आता राखीव कोट्यातील पाणी वापरण्यात येणार आहे. याला राज्य सरकारने दोन आठवड्याभरापूर्वीच परवानगी दिली आहे. राखीव कोट्यात सुमारे १ लाख ५० हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असतो. त्यामुळे यातील सुरुवातीला २५ ते ३० टक्के पाणी वापरण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.

तलावाच्या पाणलोट क्षेत्रात २०२५ मध्ये २० जून पर्यंत तब्बल ५०० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे तलावाच्या पातळीत वाढ होऊन पाणीसाठा २५ टक्के इतका झाला होता. यावेळी पाऊसच न पडल्यामुळे पाणीसाठा ९ टक्केपर्यंत खाली घसरला. २०२४ मध्ये मात्र पाणीसाठा पूर्णपणे घसरला होता. यावर्षी २० जूनला ५.३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT