Mumbai entertainment fee hike  pudhari photo
मुंबई

Mumbai entertainment fee hike : चित्रपटगृहे, नाट्यगृह तिकीट दरवाढीला तूर्तास ब्रेक; विधी समितीने प्रस्ताव परत पाठविला

शुल्कवाढीचा सुधारित प्रस्ताव प्रशासनाकडून पुन्हा सादर होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत नाटक, सिनेमा त्यासोबतच कॉन्सर्ट, मेळे आणि इतर मनोरंजनाचे शुल्क वाढीचा प्रस्ताव विधी समितीने प्रशासनाकडे परत पाठविल्याने तूर्तास दरवाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पुन्हा सुधारित प्रस्ताव सादर झाल्यानंतरच दरवाढीचा विचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, वातानुकूलित चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समधील प्रत्येक तिकिटावरील मनोरंजन कर ६० रुपयांवरून ४०० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच सध्याच्या दरात सुमारे ७०० टक्क्यांची वाढण्याची शक्यता होती. महापालिकेच्या मूल्यांकन व संकलन विभागाने मंगळवारी हा प्रस्ताव विधी समितीसमोर मांडला.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, मनोरंजन कर १९६९ मध्ये लागू करण्यात आला होता. त्यानंतर या कराच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतर राज्यांमध्ये वेळोवेळी मनोरंजन कराच्या दरांमध्ये सुधारणा केली जाते, मात्र मुंबईत गेल्या अनेक दशकांपासून हे दर कायम आहेत. मात्र, प्रस्तावित दर खूपच जास्त असल्यामुळे विधी समितीत हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आला. तसेच दरांचा फेरविचार करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दिल्या.

प्रस्तावित नवे दर याप्रमाणे :

प्रस्तावित दरवाढीत मल्टिप्लेक्ससाठी प्रति खेळ ४०० रुपये, एसी चित्रपटगृहांसाठी २०० रुपये, नॉन-एसी चित्रपटगृहांसाठी २० रुपये, तर नाटके व इतर करमणूक कार्यक्रमांसाठी १०० रुपये कराची शिफारस करण्यात आली आहे.

महापालिकेचा सुधारित मनोरंजन कराचे दर

आर्थिक वर्ष २०२७-२८ पासून लागू करण्याचा मानस आहे. मनोरंजन कर वाढविण्याच्या प्रस्तावावर प्रथम २०१५ मध्ये विचार करण्यात आला होता. २०२४ मध्ये प्रशासकीय काळात तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला; मात्र त्याची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही.

मराठी - गुजराती चित्रपट आणि कार्यक्रमांना १०० टक्के करमाफी

प्रादेशिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी आणि गुजराती चित्रपट, नाटके तसेच मैर्फीलींना मनोरंजन करातून १०० टक्के सूट देण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे. प्रस्तावात चित्रपटगृह किंवा मनोरंजनाच्या ठिकाणांच्या चालकांनी महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत कर भरल्यास ६ टक्के सवलत देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. सध्या महापालिकेला मनोरंजन करातून दरवर्षी सुमारे ३६० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. प्रस्तावित नवीन दर लागू झाल्यास हा महसूल वाढून सुमारे ५०० ते ५५० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT