Mumbai Eid Milad Procession Clash Pudhari
मुंबई

Mumbai Eid Milad Clash: ईद मिलाद मिरवणुकीत अचानक राडा! परळमध्ये दोन गट भिडले, दगडफेकीनंतर मोठा पोलिस बंदोबस्त

Mumbai Eid Milad Procession Clash: मुंबईतील परळ-चिंचपोकळी परिसरात ईद मिलाद मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाल्यानंतर दगडफेकीची घटना घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Eid Milad Procession Clash: मुंबईतील परळ-चिंचपोकळी परिसरात बुधवारी रात्री ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घोषणाबाजीवरून वाद सुरू झाल्याची माहिती असून, त्यानंतर दोन्ही गटांमध्ये बाचाबाची आणि दगडफेकीची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना परळमधील लक्ष्मी कॉटेज इमारतीजवळ घडली. रात्री सुमारे 7 वाजता किरकोळ वाद सुरू झाला होता. त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तणाव वाढला. काहींनी बॅनर फाडल्याचा आरोपही करण्यात आला असून, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्याने परिस्थिती चिघळली.

या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर जमल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी लोकांमध्ये वाद सुरू असून, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी कारवाई करण्यात आली.

घटनेनंतर परळ, चिंचपोकळी आणि आसपासच्या परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. खबरदारी म्हणून काही रस्ते बंद करण्यात आले, तर भायखळा-लालबाग-परळ मार्गावरील पुलावरून वाहनांची वाहतूकही काही काळ बंद करण्यात आल्याची माहिती आहे. वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले.

मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

गुरुवारी सकाळी परळ-चिंचपोकळी परिसरात परिस्थिती सामान्य असल्याचे दिसून आले. दुकाने सुरू होती आणि वाहतूकही सुरळीत सुरू होती. मात्र, कोणतीही अफवा पसरवू नये आणि सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT