मुंबई: आफ्रिकेतील काही भागांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना वेगाने सुरू केल्या असून भारतात कुठेही या साथीचा रुग्ण आढळलेला नसला तरी कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी 10 खाटांचा विशेष विलगीकरण वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
सध्या या विशेष वॉर्डमध्ये 10 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असली तरी आवश्यकता भासल्यास खाटांची संख्या वाढविण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे. ही संपूर्ण यंत्रणा केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उभारण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
हा विशेष वॉर्ड केवळ इबोलाच नव्हे, तर इतर गंभीर संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांसाठीही आहे. रुग्णालयात अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, सुरक्षा साहित्य, संसर्ग नियंत्रण यंत्रणा आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
कस्तुरबा रुग्णालय संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी मुंबईतील प्रमुख केंद्र मानले जाते.कोरोनाच्या लढाईतही हे रुग्णालय आघाडीवर होते. त्यामुळेच इबोलाची नोंद घेत पहिला वॉर्ड कस्तुरबामध्ये सज्ज करण्यात आला.
इबोला पसरतो कसा ?
महापालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, इबोला विषाणू संक्रमित व्यक्तीचे रक्त, शरीरातील द्रव, स्राव किंवा दूषित वस्तूंच्या थेट संपर्कातून पसरतो. हा विषाणू कोविड-19 प्रमाणे हवेतून सहज पसरणारा नसल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.