मुंबई: उपनगरांतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाची मायक्रो सर्फेसिंगने सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्ग खड्डेमुक्त होणार आहेत. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या लाखो वाहनचालकांचा पावसाळ्यातील प्रवास सुखकर होणार आहे. याकामासाठी पालिकेला 164 कोटी 94 लाख खर्च येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हे दोन्ही प्रमुख रस्ते नोव्हेंबर 2022 मध्ये महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे पालिकेने या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी मास्टिक वापरून दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु याचा दोषदायित्व कालावधी संपल्यामुळे आता रस्त्यावर ठिक-ठिकाणी छोटे-मोठे खड्डे दिसून येतात. काही ठिकाणी रस्त्याची लेवल वर-खाली झाली आहे. त्यामुळे पालिकेने या दोन्ही रस्त्यांची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मायक्रो सर्फेसिंगने ही सुधारणा करण्यात येणार असल्यामुळे या मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत, असा दावा पालिकेकडून केला जात आहे.
यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी कामे हाती घेतली जाणार आहेत.
पुलांच्या डागडुजीची कामे सुरू
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला, आरे, दत्तपाडा, राष्ट्रीय उद्यान व रावळपाडा व पूर्व द्रुतगती महामार्गावरील कुर्ला, छेडा नगर, एससीएलआर, घाटकोपर, विक्रोळी, ऐरोली जंक्शन उड्डाण पुलाच्या पृष्ठभागाची दुरवस्था झाली आहे. या पुलांची मास्टिक वापरून सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात उड्डाणपूलही खड्डेमुक्त होणार आहेत.
पूर्व द्रुतगती महामार्गाची लांबी 19 किलोमीटर असून रुंदी 60 मीटर इतकी आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाची लांबी 26 किलोमीटर, तर रुंदी 42 मीटर इतकी आहे.
दोन्ही रस्त्यांच्या सुधारणेसाठी सुमारे 164 कोटी 94 लाख रुपये खर्च येणार आहे. यात पूर्व द्रुतगती महामार्गासाठी 77 कोटी 14 लाख,तर पश्चिम द्रुतगती महामार्गासाठी 87 कोटी 80 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.