MPSC Drug Inspector Exam Paper Leak  AI Photo
मुंबई

Drug Inspector Exam Paper Leak | औषध निरीक्षक प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणखी चौघांना अटक; संशयितांची संख्या ११ वर

प्रश्नपत्रिका मिळवून देणाऱ्या उमेदवारांशी मध्यस्थी करणारे दोघेही जाळ्यात; आरोपींची संख्या ११ वर

पुढारी वृत्तसेवा

MPSC Drug Inspector Exam Paper Leak Four More Arrested

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने आणखी चार जणांना अटक केली आहे. संदीप खलाटे, भैरवनाथ कदम, साजिद संदे आणि विजय किंगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी या प्रकरणात सात जणांना अटक झाली होती. त्यामुळे अटक आरोपींची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.

एमपीएससीच्या औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्गातील १५४ पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा परीक्षा केंद्रांवर चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची गोपनीयता आणि निष्पक्षता भंग करून आर्थिक फायद्यासाठी प्रश्नपत्रिकांची अनधिकृत देवाणघेवाण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कफ परेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याचा आरोप

गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने तांत्रिक आणि सखोल तपास केल्यानंतर एमपीएससीच्या गोपनीय कक्षातून तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांच्या प्रती गैरमार्गाने बाहेर काढून त्या आर्थिक फायद्यासाठी मिळविण्याच्या प्रकरणातील सरकारी अधिकारी, मध्यस्थ आणि उमेदवारांची भूमिका समोर आणली. यापूर्वी अवर सचिव अभिजित लेंडे, गोपनीय कक्षातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश ऊर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली होती.

तपास पुढे नेताना गैरमार्गाने प्रश्नपत्रिका मिळविणाऱ्या उमेदवारांपर्यंत ती पोहोचविणे तसेच या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींची भूमिका उघड झाली. साजिद संदे याचा सांगली येथून, तर विजय किंगर याचा बुलडाणा येथून शोध घेण्यात आला. त्यांच्यासह मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय असलेल्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांना नवी मुंबईतून विशेष तपास पथकाने अटक केली.

अटक केलेल्या चारही आरोपींची चौकशी सुरू असून प्रश्नपत्रिका नेमकी कोणाकडून कोणापर्यंत पोहोचली, त्यासाठी आर्थिक व्यवहार झाला का, तसेच या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे. तपासातून प्रश्नपत्रिका फुटीच्या संपूर्ण साखळीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करीत असून पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय आणि पोलिस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT