Mumbai drain cleaning scam Pudhari
मुंबई

Mumbai drain cleaning scam: नालेसफाईवरून रणकंदन; कामचुकार कंत्राटदारांना गजाआड करू

स्थायी समिती अध्यक्षांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील नालेसफाईच्या कामांमध्ये चालढकलपणा सुरू आहे. असे असताना स्थायी समितीत सादर करण्यात आलेल्या परिमंडळनिहाय अहवालात 75 टक्के नालेसफाई केल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र तो फोल ठरला आहे. त्यामुळे मंगळवारी स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला चांगले धारेवर धरले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नालेसफाईमध्ये जो बदमाशी करेल, त्याला गजाआड टाकू, असा इशाराच थेट कंत्राटदारांना दिला.

मुंबई सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा अहवाल मंगळवारी स्थायी समितीत सादर करण्यात आला. यात परिमंडळनिहाय 70 ते 75 टक्के नालेसफाई केल्याचा दावा करण्यात आला होता. यावर सभागृह नेते गणेश खणकर यांनी हरकतीचा मुद्दा घेतला.

नालेसफाईच्या कामांमध्ये म्हणावी तेवढी गती नसून अनेक ठिकाणी नाल्याच्यालगत अधिकृतरित्या झोपड्या उभ्या राहिल्यामुळे काम करण्यात अडथळा येत आहे. नाल्यांमध्ये राजरोसपणे डेब्रिज टाकण्यात येत आहे. असे असताना पालिका प्रशासनातील अधिकारी आहेत कुठे, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मिठी नदीसह गोवंडी, कुर्ला, मालाड आधी भागात सध्या नालेसफाई सुरु न झाल्याचे सदस्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तर शिवसेनेचे यशोधर फणसे यांनी पालकमंत्र्यांचा नालेसफाईचा पाहणी दौरा असतो. तेव्हा जोमात काम सुरू होते. पण जशी पाठ फिरेल तसे काम थांबले जाते.

अंधेरी पश्चिमेकडील आझाद नगर येथील मोगरा नाल्याबाहेर गेल्या अनेक दिवसांपासून सफाईच्या मशीन पडून आहेत. सफाई कामगारही दिसून येत नसल्याचे त्यांनी समितीच्या निदर्शनास आणले.

मनसेचे यशवंत किल्लेदार यांनीही माहीम येथील मिठी नदीचे काम सुरू झाले नसल्याचे निदर्शनास आणले. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महापालिका नालेसफाईवरून प्रशासनाची चांगलीच कान उघडली केली.

अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करा

नाल्यावर नव्याने अनधिकृत झोपड्या उभे राहिले आहेत. घाटकोपर येथे नालेसफाईची पाहणी करताना, शेकडो नव्या झोपड्या दिसून आल्या. अशा झोपड्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. आपण स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या झोपड्या आठवण्याची मागणी करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT