Mumbai Drainage Issues
मुंबई : मुंबईत मान्सूनपुर्व नालेसफाईची कामे जोरात सुरू आहेत. 31 मेपर्यंत 80 टक्के नालेसफाई करायची आहे. मात्र 18 मेपर्यंत केवळ 55 टक्केच नालेसफाई झाल्याने अवघ्या 15 दिवसांत 45 टक्के नालेसफाई करण्याचे आव्हान कंत्राटदारांसमोर आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात नालेसफाईचे काम होणार का, असा सवाल आता मुंबईकर विचार आहेत.
एप्रिल महिन्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत (15 मे पर्यंत) एकूण 9,63,696.81 मे.टन पैकी 5,30,476.07 मे.टन इतका गाळ म्हणजे 55 टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये, शहर विभागात 30,281.20 मे.टन पैकी 17,992.53 मे.टन इतका म्हणजेच 59.42 टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर, पूर्व उपनगरात 12,2864.34 मे.टन पैकी 93,431.10 मे.टन म्हणजेच 76.04 टक्के इतका गाळ काढला आहे. तसेच, पश्चिम उपनगरात 2,07,740.08 मे.टन पैकी 1,53,333.51 मे.टन इतका म्हणजेच 75.25 टक्के इतका गाळ काढण्यात आला आहे. तसेच, मिठी नदीमधून आत्तापर्यंत 2,14,315.49 मे.टन पैकी 90,625.38 मे. टन इतका अर्थात 42.29 टक्के इतका गाळ काढण्यात आला आहे. त्याचप्रमाणे छोट्या नाल्यांमधून आत्तापर्यंत 3,88,495.70 मे.टन पैकी 1,72,093.55 मे. टन इतका गाळ म्हणजेच 44.30 टक्के गाळ उपसण्यात आला आहे.
पावसाळ्यापूर्वी आवश्यक 80 टक्केपैकी उर्वरित 45 टक्के नालेसफाईची कामे 31 मेपर्यंत म्हणजेच पुढील 15 दिवसांत पूर्ण करावी लागणार आहेत. त्यासाठी नालेसफाई कामाचा वेग आणखी वाढवावा लागणार आहे. मुंबईत पावसाळ्यापूर्वी 80 टक्के, पावसाळयात 10 टक्के आणि पाऊस संपल्यावर 10 टक्के अशा तीन टप्प्यात नाले व नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे.
नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी पालिकेने कडक अटी - शर्ती आणि नियम लागू केले आहेत. कंत्राटदारांना काम सुरू करण्यापूर्वी आणि कामानंतर फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, संबंधित अभियंत्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मुंबईत मे महिन्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडल्याने नालेसफाईच्या कामांत अडथळे निर्माण होत आहेत. अवकाळी पाऊस असाच अधूनमधून पडत राहिल्यास त्याचा नालेसफाईच्या कामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने 23 कंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी नदी व इतर नदी पात्रातील गाळ काढण्याची कंत्राटी कामे दिले आहेत. त्यासाठी पालिका तब्बल 395 कोटी रुपये खर्च करणार आहे.