Mumbai Garbage Collection pudhari photo
मुंबई

Mumbai Diwali Waste Collection : दिवाळीत मुंबईत कचऱ्याचे डोंगर

पाच दिवसांत तब्बल ३६ हजार ४४५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईकर दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत आनंदात साजरा करत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी मात्र शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्यावर होते. दिवाळीच्या पाच दिवसांत शहरात नेहमीच्या तुलनेत तब्बल ४४३ मेट्रिक टन अतिरिक्त कचरा निर्माण झाला. ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत महापालिकेने एकूण ३६ हजार ४४५.०६ मेट्रिक टन घनकचऱ्याचे संकलन करून त्याची वाहतूक केली.

दिवाळीच्या काळात फटाक्यांचा कचरा, भेटवस्तूंचे खोके, पॅकेजिंग साहित्य तसेच बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या अतिरिक्त कचऱ्यामुळे स्वच्छता यंत्रणेवर मोठा ताण आला होता. मात्र, सफाई कामगार, वाहनचालक, मदतनीस, पर्यवेक्षक आणि कचरा वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या पाच दिवसांत ६ हजार ७८७ वाहनफेऱ्यांद्वारे कचऱ्याची वाहतूक करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यातील दररोजच्या सरासरी ७ हजार २००.४० मेट्रिक टन कचरा संकलनाचा विचार करता, पाच दिवसांत ३६ हजार २ मेट्रिक टन कचरा अपेक्षित होता. प्रत्यक्षात त्यापेक्षा सुमारे ४४३ मेट्रिक टन अधिक कचरा जमा झाला.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्याचे कौतुक

७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत महापालिकेने एकूण ३६ हजार ४४५.०६ मेट्रिक टन घनकचऱ्याचे संकलन करून त्याची वाहतूक केली. दिवाळीच्या काळात रस्ते सफाई, घरोघरी कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि कचऱ्याची नियोजित केंद्रांपर्यंत वाहतूक या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या.

सणाच्या काळातही कर्तव्य बजावणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे महापालिका प्रशासनाने कौतुक केले आहे. दरम्यान, नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, कचरा अधिकृत कर्मचाऱ्यांकडेच द्यावा तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि जाळणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

७ नोव्हेंबरला सर्वाधिक कचरा

दिवाळीच्या कालावधीत ७ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ७ हजार ८१०.२६ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. १ हजार ३९९ वाहनफेऱ्यांद्वारे हा कचरा उचलण्यात आला. नेहमीच्या दैनिक सरासरीपेक्षा सुमारे ६१० मेट्रिक टन अधिक कचरा या दिवशी जमा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT