Manori Desalination Project Mumbai Pudhari
मुंबई

Manori Desalination Project Mumbai: मनोरीतील प्रकल्पाला वॉचडॉग फाऊंडेशनचा विरोध; मुंबईत पावसाचे अब्जावधी लिटर पाणी समुद्रात

समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी हजारो कोटींचा खर्च कशाला?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी मनोरी येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या महागड्या विलवणीकरण प्रकल्पावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी मुंबईत कोट्यवधी लिटर पाऊस पडत असताना आणि मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी कोणतेही नियोजन न करता अरबी समुद्रात सोडले जात असताना, हजारो कोटी रुपये खर्चून समुद्राचे पाणी गोडे करण्याची घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

हा प्रकल्प रद्द करून त्याऐवजी पावसाचे पाणी साठवणे, जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन, गळती रोखणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी वाॅच डाॅग फाऊंडेशनने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडे करण्यात आली आहे.

मुंबईला सध्या भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या सात प्रमुख जलाशयांतून दररोज सुमारे चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, २०४१ पर्यंत मुंबईची पाण्याची मागणी सुमारे ६ हजार ५३५ एमएलडीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही तूट भरून काढण्यासाठी गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पांचा विचार सुरू आहे. मात्र, उपलब्ध जलस्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

मुंबईत वार्षिक सरासरी सुमारे दोन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. एका अभ्यासानुसार शहरात वर्षाला सुमारे ४३७ अब्ज लिटर पावसाचे पाणी साठविण्याची संभाव्य क्षमता आहे.

त्यातील ५० टक्के पाणी जरी साठवले, तरी दररोजच्या सरासरी हिशेबाने सुमारे ६०० एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकते. जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसातून ३८६ ते ४४५ अब्ज लिटर पाणी उपलब्ध झाल्याचा अंदाज असून, त्यातील बहुतांश पाणी वाहून गेले.

याच कालावधीत महापालिकेच्या १९ पंपिंग स्टेशनमधून सुमारे ४२.९०५ अब्ज लिटर पाणी समुद्रात आणि खाड्यांमध्ये सोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईतील ऐतिहासिक तलाव, पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

ऐतिहासिक नोंदींमध्ये ३०० हून अधिक जलस्रोतांचा उल्लेख असून, त्यापैकी ६८ जलस्रोत अस्तित्वात असल्याचे सांगण्यात आले आहे. या तलावांचे सीमांकन, गाळ काढणे, अतिक्रमण हटविणे आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारकडे १३ मागण्या

मनोरी येथील प्रकल्पाचे काम तातडीने थांबवावे, प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, मुंबईचा सर्वंकष जललेखा तयार करावा, पर्जन्यजल साठवण सक्तीची करावी, तलावांचे पुनरुज्जीवन करावे, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर वाढवावा, जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी आणि पाणीगळती व चोरी रोखण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशा एकूण १३ मागण्या करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT