Mumbai Tree Fall Reason Explained in Marathi
राजेश सावंत, मुंबई
मॅनहोलसह आता झाडेही जीवघेणी ठरत आहेत. मात्र मुंबईकरांचे धोकादायक झाडांपासून संरक्षण करण्यात महापालिका सपशेल फेल ठरली आहे. कोणते झाड धोकादायक हे ठरवण्यासाठी महापालिकेकडे वृक्षतज्ञच नाहीतर गेल्या दहा वर्षात झाडांचे ऑडिट ही झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालूनच फिरावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे व त्याच्या फांद्या कापण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालय नुसार कंत्राटदाराची नियुक्ती करते.
यासाठी किमान १४० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. तरीही दरवर्षी हजारो झाडे व त्याच्या फांद्या पडतात. यंदा झाडे व फांद्या पडण्याची संख्या जास्त असून गेल्या आठवड्याभरात सुमारे ८३६ झाडे व फांद्या पडल्या. विशेष म्हणजे झाडे पडलीच नाही तर त्यांनी एका निष्पाप १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बळीही घेतला. तर अनेक विद्यार्थ्यांना जखमी केले. दोनच दिवसांपूर्वी सांताक्रुझ पश्चिम येथे एक झाड कोसळून ८ जण जखमी झाले. किमान आतापर्यंत सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आपण आता मुंबईत सुरक्षित आहोत की नाही, अशी शंका मुंबईकरांना येऊ लागली आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले होते. त्यानंतर पालिकेच्या प्रत्येक परिमंडळामध्ये झाडांची देखरेख करण्यासाठी वृक्षतज्ञ नेमण्याची मागणी पालिका सभागृहात तत्कालीन विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता पदपथावरून चालत असताना झाड पडून कधी मृत्यू येईल, हे सांगता येत नाही.
शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षतोड नाही
धोकादायक झाडे व फांद्या कापण्यासाठी वृक्ष संगोपन तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र तज्ञ मिळत नसल्याचे सांगून पालिकेने अनुभव नसलेल्या कंत्राटदाराकडून धोकादायक झाडे छाटण्यास सुरुवात केली.
पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांना वृक्षतोड किंवा छाटणीचे कोणतेही कौशल्य नाही. नियुक्त केलेले कंत्राटदार वाहतूक कंपन्या तर काहीजण नालेसफाई करणारे कंत्राटदार आहेत. नफा कमावण्यासाठी कंत्राटदार धोकादायक झाडांच्या नावाखाली चांगली झाडेही कापत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.पर्यावरण प्रेमींचा खो !धोकादायक झाडे व फांद्या ७ जून पूर्वी म्हणजेच पावसाळ्यापूर्वी कापण्याचे बंधनकारक आहे. पण पर्यावरणवादी हे काम सुरू असताना धोकादायक झाड व फांद्या तोडण्यास हरकत घेतात.
अनेक झाडांच्या फांद्या या मृत असताना देखील त्या तोडण्यास विरोध करतात. धोकादायक फांद्यांमुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे सांगूनही पर्यावरणवादी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची खंत पालिकेच्या उद्यान विभागाकडून व्यक्त करण्यात आली.
वादळामुळे झाडे पडणारच...
धोकादायक झाडांबाबत उद्यान विभाग नियमित सतर्क असतो. धोकादायक असलेली झाडे व फांद्या दरवर्षी कापण्यात येतात. मात्र पावसाळ्यात वाऱ्याचा प्रवाह जास्त असतो. त्यामुळे सुस्थितीतील झाडेही पडतात, असे पालिकेच्या उद्यान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
मुंबईत २९ लाख ७५ हजार झाडे
मुंबईत सुमारे २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०० एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.
झाडे व फांद्या का पडतात
झाडांना कीड लागणे
झाडांची लागवड करताना ती खोलवर न लावणे
झाडांना खिळे ठोकणे
सिमेंट काँक्रीट रस्त्यामुळे झाडांच्या मुळांना बसणारा धक्का
जोरदार वारा
झाडांची निगा न राखणे
झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी न होणे
खिळ्यामुळे जातोय जातोय जीव
जाहिरात बाजीसाठी झाडांना ठोकले जाणारे खिळे किंवा गुंडाळलेली तार यामुळे छिद्र तयार होते. त्यातून कीटक, जिवाणू आतमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे झाडे पोखरली जातात. एखादे झाड बाहेरून सुदृढ दिसते. मात्र आतून ते पोखरलेले असते. असे वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य वृक्षप्रेमी अभिजित चव्हाण यांनी सांगितले.