मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून खुंटलेला पाणीसाठा आता वाढू लागला आहे. शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पाणीसाठा नव्वदी पार पोहचला आहे. म्हणजेच ९० टक्केपेक्षा जास्त झाला आहे.
तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे गेल्या काही दिवसापासून पाण्याची वाढ थांबली होती. परंतु शनिवारी मध्यरात्रीपासून पालघर व ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलावातील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. सातही तलावातील पाणीसाठा १३ लाख ४ हजार ९८१ दशलक्ष लिटरवर पोहचला आहे. विशेष म्हणजे शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील भातसा तलावातील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. या तलावातील पाणीसाठा ८८.६५ टक्केवर पोहचला आहे.
दरम्यान मुंबई शहरातील नॅशनल पार्कमध्ये असलेला तुळशी तलावही आता भरत आला असून तो कोणत्याही क्षणी ओसंडून वाहू लागेल. हा तलाव भरण्यासाठी अवघ्या ३५६ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. विहार तलावातील पाणीसाठाही ८७ टक्केवर पोहचला आहे. विहार व तुळशी तलाव क्षेत्रात गेल्या २४ तासात १२० ते १३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अपर वैतरणा - १,९४,८५४
मोडकसागर - १,१४,०८१
तानसा - १,४२,२९८
मध्य वैतरणा - १,८६,२९७
भातसा - ६,३५,६३८
विहार - २४,०९८
तुळशी - ७,७१५