मुंबई: मुंबई शहरासह उपनगरांत लाखोंची बक्षिसे लावलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी जोगेश्वरीच्या जय जवान, माझगाव ताडवाडीसह गल्लीबोळातील गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. शनिवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी ५ ते १० थरापर्यंत मानवी मनोऱ्यांची स्पर्धा मुंबईकरांना विविध वाद्यांच्या तालावर अनुभवता येणार आहे.
दहीहंडीत मुंबईत सुमारे दीड हजार मंडळांचे गोविंदा हंडी फोडण्याचा प्रयत्न करतील. प्रमुख पथकांनी ११ थरांची हंडी फोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने गेला महिनाभर या पथकांचा सराव सुरू होता. पुरुष गोविंदा पथकांबरोबरच मुंबईत महिला गोविंदा पथकांचाही सहभाग वाढत आहे. अनेक महिला पथकांनी यंदा सात थरांची हंडी फोडण्याचे ठरवले आहे.
गोविंदांसाठी राज्य सरकारकडून विमा संरक्षण पुरवण्यात आले आहे.१ लाख ६० हजार गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० हजार अधिक गोविंदांचा समावेश या विमा कवचात झाला आहे.