Dahi Handi Pudhari
मुंबई

Dahi Handi Injured Govinda: उत्साहाच्या थरांना जखमांचे गालबोट; यावर्षी ३७६ गोविंदा जखमी

गेल्या वर्षी ३१८, २०२४ मध्ये २४८

पुढारी वृत्तसेवा

अदिती कदम

मुंबई: दहीहंडीच्या उंच थरांची चुरस वाढत असतानाच जखमी गोविंदांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यंदा सकाळी आठपर्यंत तब्बल ३७६ गोविंदा जखमी झाले असून, गेल्या वर्षीच्या ३१८ आणि २०२४ मधील २४८ जखमींच्या तुलनेत यंदाची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदाच्या दुर्घटनांमध्ये एका सात वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला असून, ५३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई शहरात सर्वाधिक १८३ जखमींची नोंद झाली. त्यापैकी २९ जण दाखल असून, २३ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पूर्व उपनगरात ६२ जखमींपैकी ११ जण दाखल असून, ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पश्चिम उपनगरात १२६ जखमींपैकी नऊ जण दाखल, १४ जणांवर उपचार सुरू असून, १०३ जणांना घरी सोडण्यात आले.

केईएममध्ये सर्वाधिक ७६ जखमी दाखल झाले. त्यापैकी १८ जणांवर उपचार सुरू असून, ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. नायरमध्ये ३२, सायनमध्ये १८, राजावाडीत ३३, बीडीबीएमध्ये १८, एचबीटी ट्रॉमा रुग्णालयात ३४, तर व्ही. एन. देसाई रुग्णालयात ३३ जखमींवर उपचार करण्यात आले.

दहीहंडीच्या थरात सहभागी झालेला २५ वर्षीय अभिषेक सामिला मंडलू याचाही डावा पाय गंभीर जखमी झाला. चेंबूर येथे राहणारा अभिषेक ‘गणेश बाग’ गोविंदा पथकासोबत सहभागी झाला होता. रात्री त्याच्यावर केईएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

पनवेलमध्ये विजेच्या धक्क्यामुळे सात जखमी

पनवेल शहरातील लाईन आळी परिसरात शिवसेना शाखेजवळ असलेल्या नवनाथ पंथीय आस्थानात ही दहीहंडी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. या उत्सवात दुपारपर्यंत पावसाने दडी मारल्याने आयोजकांनी गोविंदांवर पाण्याचा फवारा मारण्याची व्यवस्था केली. पाण्याच्या संपर्कामुळे विजेच्या लोखंडी खांबाला बांधलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याचे सांगण्यात येते. या तारेच्या संपर्कात आलेल्या सात जणांना विजेचा जोरदार धक्का बसला.

सातव्या थरावरून पडला स्वप्नील

दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या सातव्या थरावरून पडून ताडदेव येथील नवीन जायफळवाडी गोविंदा पथकाचा २६ वर्षीय स्वप्नील गुरव जखमी झाला. थर कोसळल्यानंतर तो खाली पडला आणि त्याच्या मानेला दुखापत झाली. स्वप्नील दहा वर्षांपासून दहीहंडीमध्ये सहभागी होत आहे. स्वप्नील महिनाभरापूर्वीच नोकरीला लागला होता.

प्रेक्षकांना दुखापत

दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीलाही यंदा अपघाताची झळ बसली. दादरच्या फूल मार्केटजवळ दहीहंडीचा थर रचला जात असताना वरून कोसळलेल्या गोविंदामुळे खाली उभ्या असलेल्या दीपाली या तरुणीच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून, येत्या मंगळवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

तिसऱ्या थरावरून पडला १७ वर्षीय अनमोल

दहीहंडीच्या तिसऱ्या थरावरून पडून १७ वर्षीय अनमोल शृंगारपुरे जखमी झाला. त्याच्या मानेला दुखापत झाली असून, डाव्या बाजूला काही काळ सुन्नपणा जाणवत होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT