Flower Market Pudhari
मुंबई

Flower Prices in Mumbai : दिवाळीनंतर मुंबईत नैसर्गिक फुलांचा बाजार घसरला

दरामध्ये सरासरी ४० टक्क्यांनी घट; तुळसी विवाह आणि मार्गशीर्ष महिन्यात दर वाढण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दिवाळीत नैसर्गिक फुलांना मोठी मागणी होती. त्यामुळे आठवडाभर फुलांच्या बाजारात तेजी पाहायला मिळत होती. मात्र, दिवाळी संपताच नैसर्गिक फुलांची मागणी कमी झाली आहे. दादरच्या फुलबाजारात दिवाळीत दिवसाला १८० ते २०० वाहनांमधून फुलांची आवक व्हायची. ती आता दिवसाला ३० ते ४० वाहनांवर आली आहे. त्यामुळे फुलांच्या दरात सरासरी ४० टक्के घट झाली आहे. पण तुळसी विवाह आणि मार्गशीर्ष महिन्यात फुलांच्या दरात पुन्हा वाढ होईल, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे.

मुंबईतील फुल बाजारात विशेषत: नाशिक, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातून नैसर्गिक फुले येतात. दिवाळीमुळे आठवडाभर भायखळा दादर भुलेश्वर या फुलबाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होती. दोन दिवसांपूर्वी भाऊबीज झाल्याने फुल बाजारामध्ये फुलांची आवक कमी झाली असून त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. २१ नोव्हेंबरला असलेल्या तुलसी विवाह अगोदर आणि त्या दिवशी बाजारात पुन्हा फुलांचे दर चढते राहतील अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

शेतकऱ्यांचे लक्ष मार्गशीर्ष महिन्याकडे

दिवाळी सण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी थेट मुंबई गाठत स्वत: नैसर्गिक फुलांची विक्री सुरु केली. त्यामुळे सणाच्या काळात बऱ्यापेेकी शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडले. आता हा सणांचा हंगाम संपल्यानंतर फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष मार्गशीर्ष महिन्याकडे लागले आहे.

मार्गशीर्षमध्ये देखील फुलांना चांगला बाजारभाव मिळण्याची परंपरा आहे. सध्या वातावरणातील बदलांमुळे अपेक्षित प्रमाणात आणि दर्जाची फुले दाखल होताना दिसत नाहीत. मात्र;ज्या शेतकऱ्यांकडे उत्तम दर्जाची फुले उपलब्ध आहेत, त्यांच्या मालाला बाजारात चांगले दर मिळतो असे फुल विक्रेत्याकडून सांगण्यात आले.

सध्या फुलबाजारात दिवाळीनंतर नैसर्गिक फुलांची आवक कमी झाली असून दरात घसरण झाली आहे. तुलसी विवाह, त्यानंतर सुरु होणारा लग्नसराईचा हंगाम व डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यावेळी फुलांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
मनोहर लोणारी, फुलविक्रेते, दादर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT