CSMT Bomb Threat pudhari photo
मुंबई

CSMT Bomb Threat : सीएसएमटी रेल्वे स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी

तीन तास तपासणीनंतर ठरली अफवा; डायल ११२ वर अज्ञाताचा फोन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याने शनिवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर अज्ञात व्यक्तीने फोन करून स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. त्यानंतर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. तीन तासांच्या तपासणीनंतर ही धमकी अफवा ठरली.

शनिवारी सायंकाळी सुमारे ६.४० ते ६.५० च्या दरम्यान वाडीबंदर येथील लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. त्यानंतर तपासणी पथकाकडून ९.३० पर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. या कारवाईदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली नव्हती.

मोबाईलच्या आधारे कॉलरचा शोध

धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला आहे. त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

अन्य स्थानकांवरही सुरक्षा

या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेच्या अन्य प्रमुख स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि मुंबईतील अन्य महत्त्वाच्या स्थानकांवर सुरक्षा तैनात वाढविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT