Fake Doctor Mumbai Pudhari
मुंबई

Fake Doctor Mumbai: २८ वर्षे बनावट डॉक्टर बनून वावर; सीएसआर फंडातील सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहाराचा संशय

या फसवणुकीचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरले असण्याची शक्यता तपासात समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण कक्षाने तब्बल २८ वर्षांपासून स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करणाऱ्या एका तोतया डॉक्टराला अटक केली. आरोपीने बनावट ओळखपत्रांच्या आधारे डॉक्टर असल्याचा बनाव करून विविध बँकांमध्ये खाती उघडली आणि साथीदारांच्या मदतीने मागील तीन वर्षांत सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतील सुमारे १० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांतील व्यक्ती आणि कंपन्यांची कागदपत्रे, प्रकल्प अहवाल तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. त्यामुळे या फसवणुकीचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरले असण्याची शक्यता तपासात समोर आली आहे.

झडतीदरम्यान आरोपीकडून " डॉ. धर्मेंद्र कुमार" या नावाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, विविध संस्थांनी दिलेली प्रमाणपत्रे तसेच वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट ओळख वापरणे आदी कलमांसह वैद्यकीय व्यवसाय आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला १६ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT