मुंबई : जुन्या वादातून एका 25 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने वार करून हत्या केली. विशाल दयाराम कोंकणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी अंकुश कृष्णबहादूर सिंग या 21 वर्षांच्या आरोपीस साकीनाका पोलिसांनी सहा तासांत शिताफीने अटक केली.
हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मृत विशाल आणि आरोपी अंकुश हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शनिवारी रात्री उशिरा पाऊणच्या सुमारास घाटकोपर येथील असल्फा, हिमालय सोसायटीसमोर घडली. याच सोसायटीमध्ये विशाल, तर शिवप्रभा सोसायटीमध्ये अंकुश हा राहतो. ते दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्याविरुद्ध घाटकोपर आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर विशालसह त्याचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मोठ्या भावाने अंकुशला बेदम मारहाण केली होती. त्याचा अंकुशच्या मनात राग होता. शनिवारी रात्री या दोघांनी मद्यप्राशन केले होते. रस्त्यावरून जाताना ते दोघेही समोरासमोर आले. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता.या वादानंतर अंकुशने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने विशालवर वीस ते पंचवीसहून अधिक वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अंकुशचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अवघ्या सहा तासांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.