मुंबई : अल्पवयीन मुलीचा सावत्र पित्याने विनयभंग केल्याची घटना दहिसर येथे घडली. याप्रकरणी 43 वर्षांच्या पित्याला दहिसर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पीडित मुलगी ही चौदा वर्षांची असून ती दहिसर येथे राहते. आरोपी तिचा सावत्र पिता आहे. गेल्या एक महिन्यांपासून तो तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत होता. तिला मिठी मारणे, तिच्या छातीला नकोसा स्पर्श करून तिचा विनयभंग करणे असे त्याने चार ते चार वेळा चाळे केले होते. या घटनेने ती प्रचंड घाबरली होती. बदनामीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
दोन दिवसांपूर्वी त्याने पुन्हा तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या सावत्र पित्याविरुद्ध तक्रार केली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या सावत्र पित्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिंडोशीतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.